डॉ. राम वाघमारे साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथील प्रतिष्ठित मानला जाणारा साहित्य भूषण पुरस्कार

0

नांदेड, रयतसाक्षी: नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. राम वाघमारे यांना कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथील प्रतिष्ठित मानला जाणारा साहित्य भूषण पुरस्कार संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या चौथ्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत शहासने, स्वागताध्यक्ष डॉ. बबन जोगदंड, उदघाटक स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, आयपीएस अधिकारी अनंत ताकवाले, नंदिनी शहाणे आदींची उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह, वृक्ष, शाल आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. राम वाघमारे हे नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथे सहशिक्षक असून त्यांनी कथा, कादंबरी, चरित्र लेखन, संपादन, समीक्षा इ. प्रकारात मुशाफिरी केली आहे. ‘डोन्ट वरी सर’ (कथासंग्रह) खेळ, गुरुजींची शाळा, लढा, फाइट फॉर द राइट (कादंबऱ्या), समकालीन कादंबरीकार भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे (समीक्षा), काकांच्या शैक्षणिक गप्पा (वैचारिक), कोहिनूर ए गजल (चरित्र), ग्रेॅपल (इंग्रजी अनुवादित कादंबरी), उर्जास्त्रोत, दीपस्तंभ, जखमांचे सुगंधीपण जपणारा इलाही (संपादन) इ. साहित्य प्रकाशित असून काळ्या व 98% हे दोन लघुचित्रपटही त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांनी आकाशवाणी व अनेक वर्तमान पत्रातून कथा, कविता, ललित, समीक्षापर लेखन केले आहे.

डॉ. राम वाघमारे यांना साहित्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व शिक्षक, साहित्यिक, मित्र यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.