करोनाला रोखण्यात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही!

भारतासारख्या देशांनी…”, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांनी स्पष्टच सांगितलं!

0

रयतसाक्षी: करोना काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देखील नाईट कर्फ्यू अर्थात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय अनेकदा घेतला आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केल्यामुळे करोना पसरणार नाही का? अशी शंका देखील त्यावर अनेकदा काढली गेली. मात्र, तरीदेखील सरकारकडून रुग्णसंख्या वाढू लागताच नाईट कर्फ्यूचे निर्बंध लागू केले जातात. मात्र, आता WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्मामीनाथन यांनीच यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच, भारत सरकारला अशा परिस्थितीत काय करायला हवं? याचा देखील सल्ला दिला आहे.

डॉ. सौम्या स्मामीनाथन या जागतिक आरोग्य संघटनेमध्ये मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये करोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी भाष्य केल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नलनं दिलं आहे. यामध्ये बोलताना डॉ. स्वामीनाथन यांनी भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांनी कशा प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात, नाईट कर्फ्यू का उपयोगी नाही, याविषयी भूमिका मांडली आहे.

वैज्ञानिक आधार नाही
नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या आहेत. “करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवं”, असं त्यांनी सांगितलं.

“नाईट कर्फ्यूला आधार नाही. विषाणूला रोखण्यासाठी विज्ञाना वर आधरित, पुराव्यांवर आधारित उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येऊ शकेल”, असं त्या म्हणाल्या आहेत.

सार्वजनिक कार्यक्रम प्रसारासाठी कारणीभूत!
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी होणारे जाहीर कार्यक्रम हे विषाणूच्या प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. “अशा जाहीर कार्यक्रमांमुळे, मनोरंजनाच्या ठिकाणी विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे अशा ठिकाणांवर निर्बंध टाकणं हे साहजिक आहे. भारतीयांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहायला हवं”, असा सल्ला त्यांनी दिला.

ही तर फक्त सुरुवात!
दरम्यान, ओमायक्रॉनच्या प्रसाराविषयी डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी वेगळीच चिंता व्यक्त केली. “भारतात ओमायक्रॉनच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. मला वाटतं ही फक्त सुरुवात आहे. फक्त काही शहरांमध्ये ओमायक्रॉनबाधित आढळत आहेत. पण पुढे जाऊन मोठ्या लोकसंख्येला ओमायक्रॉनची बाधा होण्याची शक्यता आहे”, असं त्यांनी नमूद केलं.
शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशभरात २२ हजार ७७५ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून ४०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांचा आकडा आता १४३१ इतका झाला आहे. देशात सध्या १ लाख ४ हजार ७८१ अॅक्टिव केसेस असून रिकव्हरी रेट ९८.३२ टक्के इतका आहे.

 

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारत सरकारला विज्ञान आणि पुराव्यांवर आधारित उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.