आधुनिक सावित्रीने दिली स्थलांतरीत पाल्यांना शिक्षणाची उब

पालातल्या अज्ञानावर चिमुकल्यांची मात ; प्रवाहात आणण्याची सावित्रीची धडपड

0

अर्धापूर, रयतसाक्षी; स्थलांतरीत कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनासह सर्वच स्तरारातून प्रयत्न सुरू असले तरी अद्याप बहूतांश पाल्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचलेली नाही . शिक्षणापासून वंचित, स्थलांतरीत विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील आधुनिक सावित्री जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षिका उषा नळगिरे यांची धडपड सुरू आहे. पालकांची मानसिकता तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात त्यांना चांगलेच यश मिळत आहे.

पालावर भेट देऊन पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले

स्थलांतरित कुटूंब पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती असते. साहजिकच चिमुकल्याचीही त्यांच्या सोबत भटकंती सुरू असते. गाव आणि शाळा कोसोदूर असते. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहत असतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील असेच एक कुटुंब नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसमत फाटा (ता.अर्धापूर) नजीक आलेले आहे. या कुटुंबाच्या पालावर बालरक्षक चळवळीत सहभाग घेणाऱ्या शिक्षिका उषा नळगिरे यांनी भेट दिली. इथे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यावेळी येथील पालकांचे समुपदेशन करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांची प्रथमतः मानसिकता बनविली.

अभ्यासाची लावली गोडी

विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देऊन अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्यांची धडपड सध्या सुरू आहे. यातील अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून येणाऱ्या काळातही आम्ही आमच्या चिमुकल्याना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

स्वखर्चाने देणार शैक्षणिक साहित्य..!

बालरक्षक चळवळीत कार्य करणाऱ्या उषा नळगिरे यांचे सातत्याने काम सुरू आहे. नुकतेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे त्यांच्या कामाची नोंद झाली असून त्यांचा प्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्या मुलाच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य व इतर अत्यावश्यक वस्तू लवकरच स्वखर्चाने उपलब्ध करून देणार आहेत. भटक्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या शिक्षिका म्हणून समाजात आपला एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल गटशिक्षणाधिकारी रुस्तुम ससाणे व केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.