सावित्रीबाईचा वसा चालविण्यासाठी पुढाकाराची‌‌ गरज- अध्यक्षा सौ. अंबुलगेकर

यशवंतराव चव्हाण सभागृहात संवाद सावित्रीच्या लेकींशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

0

नांदेड, रयतसाक्षी: चूल आणि मूल सारख्या रूढीवादी परंपरेतून स्त्रियांना क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांनी मुक्त केले आहे. म्‍हणूनच आज पुरुषांच्‍या बरोबरीने महिला काम करत आहेत. महिलांनी सावित्रिबाईंच्‍या विचारांचा विसर पडू न देता त्‍यांच्‍या कार्याचा वसा पुढे नेण्‍यासासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, सावित्रिबाई फुले ते मॉ जिजाऊ यांच्‍या जयंती निमित्‍त सन्‍मान महाराष्‍ट्राच्‍या लेकिंचा शुभारंभ व आजादी का अमृत महोत्सवा निमित्‍त आज सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात संवाद सावित्रीच्या लेकींशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

यावेळी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्‍या महापौर जयश्री पावडे, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्‍हा परिषदेच्‍या महिला व बाल विकास समितीच्‍या सभापती सुशिलाताई बेटमोगरेकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्रा. दीपा बियाणी, संतोष देवराये आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्‍यानंतर बिलोली येथील कस्‍तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या भरारी विशेष अंकाचे प्रकाशन करण्‍यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्‍यवरांचा बुके व पुस्‍तके देऊन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी महापौर जयश्री पावडे यांनी मार्गदर्शन करुन उपस्थितांना सावित्रिबाई फुले जयंतीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

उद्याची पिढी शाळेतून तयार होते. यासाठी शहरातील महापालिकांच्‍या शाळा आदर्श करण्‍याचा उपक्रम हाती घेतल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले. व्‍याख्‍याते संतोष देवराये यांनी आपल्‍या ओघवत्‍या भाषणातून राष्‍ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्‍योती सावित्रिबार्इ यांच्‍या जिवनावर प्रकाश टाकला. महिला व बाल विकास विभागाच्‍या सभापती सुशिलाताई बेटमोगरेकर यांनी आपल्‍या जिवनातील अनुभव सांगितले.

यावेळी विविध शाळेतील विद्यार्थिनिंनी मी सावित्री बोलते या विषयावर आपली मनोगत व्‍यक्‍त केले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी सुचीता खल्लाळ व आनंदी विकास यांनी केले. या प्रसंगी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍याशी उपस्थित महिलांनी मुक्‍त संवाद साधला.

यावेळी विचारलेल्‍या प्रश्‍नांना त्‍यांनी समर्पक उत्‍तरे दिली. या कार्यक्रमाला उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर. पाटील, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, बंडू अमदूरकर, जिल्‍हा कृषी अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेट्टे, डॉ. अरविंद गायकवाड यांच्‍यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेविका, शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, शिक्षण विस्तार अधिकारी, आशा, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा विविध संवर्गातील प्रत्येकी पाच महिला अधिकारी-कर्मचा-यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी व शालेय विद्यार्थ्‍यांनी झुम लिंकद्वारे कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

आत्मविश्वास हा दागिना- सीईओ वर्षा ठाकूर-घुगे
आत्मविश्वास हा दागिना असून आत्मविश्वासाने जगणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर त्‍याची झळाळी दिसते, म्हणून महिलांनी देखील आत्मविश्वासाने कामे हाती घेवून नवीन कौशल्य स्वीकारावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, जिल्ह्यातील महिला अधिकारी-कर्मचारी आत्मविश्वासू असून त्या कामात सक्षम आहेत. घर आणि नोकरी त्या समर्थपणे सांभाळत आहेत. कोरोना सारख्या परिस्थितीमध्येही महिलांनी पुढे येऊन कामे केलेली आहेत. यापुढे देखील नव्या दमाने व आत्मविश्वासाने महिलांनी आपल्या कामातून ठसा उमटवावा असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.