एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नांदेड जिल्ह्यात २५ कर्मचारी बडतर्फ

पोलीस बंदोबस्तात सोळा बसेस सुरु -संजय वाव्हळे

0

नांदेड, रयतसाक्षी: बडतर्फी, निलंबन कारवाईनंतरही मागील अडीच महिन्यापासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र हळूहळू या संपामध्ये फूट पडत असल्याने एकीकडे नांदेड जिल्ह्यात आज सोळा बसेस पोलीस बंदोबस्तात धावत आहेत. दूसरीकडे २५ कर्मचारी बडतर्फ झाले असून ३०० हून अधिक कर्मचारी निलंबित आहेत. या संपामुळे प्रवाशांना चांगलाच फटका बसला असून अवैध वाहतूक करणाऱ्यांचे मात्र उखळ पांढरे झाले आहे.

मागील अडीच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे लाल परीची चाके जाग्यावरच रूतली आहेत. हजारो कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसत आहे. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून खासगी वाहनांनाही प्रादेशिक परिवहन विभागाने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली असली तरी त्यांच्याकडून मात्र पुरती प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

या संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून नांदेड जिल्ह्यात नऊ आगाराअंतर्गत एकूण २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. बुधवार, दि. ५ रोजी सोळा बसेस पोलीस बंदोबस्तमध्ये प्रवाशांच्या सेवेत सुरू झाल्या आहेत.

तर दुसरीकडे वयाची ६२ वर्षे ज्यांनी ओलांडली नाही अशा सेवानिवृत्त झालेल्या चालकांना 26 हजार रुपये मानधनावर सेवेत घेण्याचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. ज्या ठिकाणाहून सदर चालक सेवानिवृत्त झाला त्या ठिकाणी त्याने सेवा करण्याची संधी द्यावी असा अर्ज करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. राज्यात जवळपास आजपर्यंत १,१४४ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले असून ११, ०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात हळूहळू एसटी बस सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. त्यामुळे‌ आता एसटीचे उत्पन्न हळूहळू वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ स्तरावरून अजूनही काही कर्मचारी बडतर्फ तर काही निलंबीत होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाव्हळे यांनी “रयतसाक्षी” शी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.