कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधरचा तडाखा सुरुच!

इ.एम.इ. जलंधर, नाशिक, हैदराबाद उपांत्य फेरीत ; शनिवारी उपांत्य फेरीचे सामने 

0

नांदेड, रयतसाक्षी; रविंद्रसिंघ मोदी :येथे सुरु असलेल्या 48 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी (क्वार्टर फायनल) सामन्यात यश मिळवत इ. एम. इ. जलंधर, आर्टलेरी नाशिक, डेक्कन हैदराबाद आणि कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधर संघानी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधर ने पंचकुला हरियाणा संघाचा 6 वि. 2 गोलाने धुवा उडविला. उद्या (शनिवारी) उपांत्य फेरीचे दोन सामने खेळले जाईल अशी माहिती दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळ हॉकीचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब यांनी दिली.

आजचा पहिला उपांत्यपूर्व सामना इ. एम. इ. जलंधर विरुद्ध मुंबई पोर्ट ट्रस्ट संघात खेळला गेला. अतिवेगवान हॉकी खेळाचे प्रदर्शन करत दोन्ही संघांनी एकमेकाविरुद्ध हल्ले चढवले पण इ. एम. इ. जलंधर संघाने जगज्योतसिंघ ढिल्लन याच्या दोन्ही गोलाच्या आधारावर “2 वि. 0” गोल अंतराने सामना जिंकत उपांत्य फेरीत नाव निश्चित केले. खेळाच्या सुरुवातीलाच जलंधर संघाच्या जगज्योत सिंघ ढिल्लन याने मैदानी गोल करत संघासाठी आघाडी घेतली. मुंबई संघाच्या चांगल्या संधी चुकल्यामुळे गोल होऊ शकले नाहीत.

शेवटच्या क्वार्टर मध्ये पुन्हा जगज्योतसिंघ याने 52 व्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढविली. शेवटी इ. एम. इ. जलंधर संघाने उपांत्य फेरी गाठली. आजचा दूसरा उपांत्यपूर्व सामना आर्टलेरी सेंटर नाशिक आणि इटारसी हॉकी क्लब मध्ये झाला. वरील सामना नाशिक संघाने 3 वि. 2 गोल अंतराने जिंकला. संजय तिडू याने केलेले दोन गोल या विजयात फलदायी ठरलेत. खेळाच्या सहाव्या मिनिटाला बलकारसिंघ याने नाशिक संघासाठी पहिला गोल केला. इटारसी संघाने 17 व्या मिनिटाला खेळात परतण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरचे रूपांतरण शुभम लाहोरिया याने गोल मध्ये करून सामना बरोबरीवर आणला. पण नाशिक संघाच्या संजय टीडा या खेळाडूने प्रतिहल्ला चढवत 18 व्या मिनिटाला गोल केला. संजय टीडा याने पुन्हा 21 व्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. इटारसी संघाने खेळात परतण्याचे मोठे प्रयत्न केले. खेळाच्या 33 व्या मिनिटाला श्वेन्टक जेम्स याने मैदानी गोल करून इटारसी संघासाठी दूसरा गोल केला. पण नाशिक संघाने शेवटपर्यंत सामना राखत 3 वि. 2 असा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीसाठी नाव निश्चित केला.

आजचा तीसरा सामना डेक्कन हैदराबाद आणि एस. एस. हैदराबाद संघा दरम्यान खेळला गेला. अटितटीच्या या सामन्यात बलाढ्य डेक्कन हैदराबाद संघाने वरील सामना 2 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश मिळविला. सुरुवातीच्या दोन्ही क्वार्टर मध्ये दोन्ही संघानी उच्चपातळीचा खेळ केला. तिसऱ्या क्वार्टर मध्ये खेळाच्या 45 मिनिटाला बी. धारणवीर याने मैदानी गोल करत सामन्यात आघाडी मिळवली. खेळ संपन्यांपूर्वी 59 मिनिटाला डेक्कन हैदराबादच्या एम. ए. अलीम ने पुन्हा एक गोल करत संघाच्या विजयाचा पाया रोवला.

आज सायंकाळी 4 वाजता एच. पी. सी. एल. पंचकुला हरियाणा विरुद्ध कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधर संघात शेवटचा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. जलंधर संघाने आपल्या तडाखेदार शैलीच्या प्रदर्शनाने हा सामना एकतर्फा ठरवत पंचकुला हरियाणावर 6 वि. 2 असा मोठा विजय संपादन केला. सामन्यात तीन गोल करणारा अंकुश विजयाचा शिल्पकार ठरला. सुरुवातीला 12 व्या मिनिटाला देविंदरसिंघ याने जलंधरसाठी पहिला गोल केला. त्यानंतर 17 व्या मिनिटाला प्रदीप मोर याने तर 27 व्या मिनिटाला अंकुशने स्वतःच्या नावे पहिला गोल नोंदवला. पुढे 34 व्या मिनिटाला पंकज याने सुरेख गोल केला. तर अंकुश याने 52 व्या व 60 व्या मिनिटाला गोल करत मोठ्या विजयाचा पाया रोवला. पंचकुला हरियाणा संघाने शेवटच्या सत्रात आक्रमक खेळ करत 53 व्या आणि 59 व्या मिनिटाला गोल केला. उद्या उपांत्य फेरीचे सामने रांगणार आहेत.

उद्याचे सामने : शनिवारी (दि. 8) रोजी हॉकीचे दोन उपांत्य सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना दुपारी 1 वाजता इ. एम. इ. जलंधर या संघात खेळला जाईल. तर दुपारी 3 वाजता आर्टलेरी नाशिक विरुद्ध डेक्कन हैदराबाद संघादरम्यान दूसरा उपांत्य सामना रंगेल. 9 रोजी अंतिम सामना पार पडेल. तसेच तृतीय पारितोषिक सामना देखील खेळला जाईल.

हर्षित क्षण :  नांदेड पोलीस दलाचे स्थानीक गुन्हे अन्वेषण विभाग (एल.सी.बी.) प्रमुख पुलिस निरिक्षक सुखदेव चिखलीकर यांनी वेळेत वेळ काढून हॉकी स्पर्धेला सदिच्छा भेंट दिली. त्यांनी मैदानात जाऊन खेळाडूंचा परिचय करून घेतला व शुभेच्छा दिल्या. श्री चिखलीकर यांचे हॉकी कमेटीचे अध्यक्ष स. गुरमीत सिंघ नवाब यांनी सत्कार केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.