केजमध्ये हनी ट्रॅप:पुरुषांवर‘मोहिनी’ चा वापर, आडमार्गावर लुटीने पितळ उघडे

आरोपिंना तीन दिवसांची पोलिस कोठडी

0

केज,रयतसाक्षी: हनी ट्रॅप करणाऱ्या डोका (ता. केज) येथील मोहिनी बप्पाजी भांगे या महिलेसह तिच्या साथीदारांचे कारनामे उघडकीस येत आहेत. केज येथील कारचालकाला लुटल्यानंतर आता पुन्हा दोन वेगवेगळ्या घटनेत तिच्यावर युसूफवडगाव व धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरो संस्थेच्या माध्यमातून मोहिनी भांगे ही तीन वर्षांपूर्वी मांडगाव शाळेत सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने आली हाेती. नंतर तिची शिक्षक बाजीराव चौरेंशी ओळख झाली. ९ सप्टेंबर २०२१ रोजी केजहून चौरेंना सोबत घेऊन मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने आंबाचोंडी रोडवर सायंकाळी वन विभागाच्या कार्यालय परिसरात गाडी थांबवण्यास सांगितली. अशोक मिसाळ आणि इतर अनोळखी चार-पाच जणांनी बाजीराव चौरेंची या महिलेबरोबर व्हिडीओ शुटींग करत त्यांना मारहाण केली. नंतर या प्रकरणी पोलिसांत अत्याचाराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देत प्रकरण दहा लाख रुपयांत मिटवण्याची मागणी केली. अडीच लाखांत हे प्रकरण मिटवले. रात्री १२ वाजता शिक्षकाला केज येथे नेवून सोडले. दरम्यान, ६ जानेवारीला शिक्षक चौरेंनी धारूर ठाण्यात तक्रार दाखल केली.

हनी ट्रॅपची दुसरी घटना केज तालुक्यात घडली. बन कारंजातील सुभाष नवनाथ नागरगोजे तीन वर्षांपूर्वी सोलापूरच्या कपड्याच्या कंपनीत ज्युनिअर मॅनेजर पदावर नोकरीस हाेता. त्या ठिकाणीही मोहिनी भांगे व सुभाष हे दाेघे कामाला हाेते. एकाच तालुक्यातील असल्याने महिलेने त्याला लग्नासाठी गळ घातली होती. विवाहितेला एक मुलगी असल्याने सुभाष यांनी तिच्याशी लग्नास नकार दिला. तरुणाचे लग्न जमल्याची माहिती तिला कळताच पैशाची मागणी करत पैसे दिले नाही तर तुझ्यावर बलात्काराची केस करील, अशी धमकी दिली. यानंतर महिलेने केज पोलिसांत २६ जून २०२१ रोजी तरुणाविरुद्ध तक्रार दिली होती. पोलिस तरुणाच्या घरी चौकशीसाठी गेल्यानंतर हा प्रकार लग्न जमलेल्या मुलीकडील नातेवाइकांना कळल्याने त्याचे लग्नही मोडले.

मोहिनी भांगेला तीन दिवसांची पोलिस कोठडी : केज येथील कार चालकास लुटल्याप्रकरणी मोहिनी भांगेसह सहा जणांवर केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने दिलेली तीन दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली.

प्रकरण मिटवण्यासाठी उकळले दीड लाख
बन कारंजा येथील सुभाष नागरगोजेंचे वडील व नातेवाइकांनी मोहिनी भांगेची भेट घेतली असता सुभाषने तिच्यावर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केले आहे, हे प्रकरण मिटवायचे असेल तर पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. तडजोडीअंती महिलेला दीड लाख रुपये व रमेश नवनाथ घुले (रा. टाकळी) याच्या फोन पेवर ५० हजार रुपये जमा केले होते. याप्रकरणी सुभाष नागरगोजेंनी शुक्रवारी तक्रार दिल्यावरून मोहिनी भांगे व रमेश नवनाथ घुलेविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. तपास सपाेनि. विजय आटोळे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.