नवे निर्बंध : ….तर दारूची दुकानेही बंद करावी लागतील

ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाहीत तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत

0

रयतसाक्षी : गर्दी होत असेल तर दारूची दुकाने, धार्मिक स्थळेही बंद करावी लागतील, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिला. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाहीत तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा बंद ठेवल्या, मात्र दारूची दुकाने सुरू असल्याने विरोधक टीका करत आहेत. गर्दी होत असेल तर दारू दुकाने बंद करू. १८ वर्षांवरील कोरोना रुग्णांना मधुमेहाचा धोका वाढल्याचा अहवाल आहे. यावर आयसीएमआरच्या सूचनांचे पालन करू, असेही टोपे म्हणाले.

राज्य सरकारची सुधारित नियमावली
शनिवारी जाहीर केलेल्या नियमावलीत ब्यूटी पार्लर आणि व्यायामशाळा बंदचा निर्णय होता, परंतु हेअर सलूनला ५०% क्षमतेने परवानगी असताना ब्यूटी पार्लर, जिम बंदच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका सुरू झाली होती. त्यानंतर रविवारी सुधारित नियमावली जारी केली.

त्याप्रमाणे या ब्यूटी पार्लरमध्ये तोंडावरील मास्क न काढता करण्यात येणाऱ्या सेवांना परवानगी असेल. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या सेवा पुरवल्या जातील. सलून कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सरकारने या सुधारित आदेशात स्पष्ट केलेले आहे. जिमही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. कोणताही व्यायाम करताना मास्क काढता येणार नाही.

संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच जिम करण्याची परवानगी आहे. जिममधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, असेही सुधारित आदेशात म्हटले आहे. राज्यात लागू झालेल्या निर्बंधानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली असून कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.