स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ माॅ साहेब !

राजेशाही काळातील सरंजामशाहीची मुल्य बदलून ती लोकाभिमुख केली

0

रमेश पवार नांदेड

आईच्या कर्तृत्वातच मुलाचं भाग्य लपलेलं असतं, असं जगज्जेता नेपोलियन म्हणाला. त्यांचा विचार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना तंतोतंत लागू पडतो. कारण त्यांना जवळपास आयुष्यभर सातत्याने आपल्या महान मातेचं सुयोग्य मार्गदर्शन लाभले. राजमाता जिजाऊंचा इतिहास हा नवयुग निर्मितीचा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांचं प्रखर, तेजस्वी, चरित्रशिल्प घडवणारे राजमातेचे हात जितके हळुवार होते तितकेच कर्तव्यकठोरही होते.मॉं साहेब जिजाऊंचे योगदान ऐतिहासिक दृष्टया महत्वाचं आहेच. राजेशाही काळातील सरंजामशाहीची मुल्य बदलून ती लोकाभिमुख केली.

 

त्यामधून वर्ण, जात,पात, लिंगभेदात, एकजिनसी सुखी समाज निर्माण करण्यासाठी नवी मुल्ये रुजविण्याचं त्यांच योगदान मोठे सामर्थ्यशाली आहे. लोकमाता साक्षात स्वातंत्र्य देवतेचा जन्म सिंदखेडराजा नगरीत लखुजीराव जाधव, गिरजाईराणी उर्फ म्हाळसाराणी, यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी राजवाड्यातील म्हाळसा महालात झाला. या कन्यरत्नाचे नाव जिजाऊ ठेवण्यात आले जिजामातेचा जन्म ही इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. हे पुढे स्वराज्य निर्मितीतून खरी ठरली.

लोकमाता जिजाऊचे बालपण राजे लखुजींच्या राजवाड्यात आणि राजवाड्यातील घुमट येथे गेले. राजवाड्याच्या भक्कम तटाच्या आतील घोड्यांच्या पागा, हत्तीखाने, संगीतशाळा, नगारखाना, शिपायांच्या कवायती, सेविकांची लगभग-धावपळ, हुजरे-मुजरे, राजेलखुजींचा प्रेमळ दरारा या वातावरणात बाळ जिजाऊचे बालपण गेले. या गावातील लोहारशाळा आणि सुतार शाळेस भेट दयायला हे बाळ चालत यायचे. सामान्य लोकांचे मुजरे स्विकारतांना त्यांच्या सुखदु:खात सामील व्हायचे. गो

रयतेबद्दल बालपणापासून त्यांचे मनात अपार करुणा भरलेली असे. ती त्यांच्या पारदर्शी हास्याने आणि मदतीच्या हाताने स्फटीकासारखी पाझरत असायची. यावरुन पुढे त्यांना मिळालेली राजमाता राष्ट्रमाता आणि साक्षात स्वातंत्र्य देवता ! लोकमाता ही पदनामे सार्थ वाटतात.

 

जिजाऊ ज्या काळात जन्मल्या, तो काळ पारतंत्र्याचा. भारतात सर्वत्र मुसलमानांची सत्ता सारी रयतच नव्हे तर पराक्रमी अनेक मर्द मराठे सरदारही त्यांचे चाकरीला ! अशा काळी पुरुषांना जिथे शिक्षणाच्या सोयी नव्हत्या तिथे स्त्रियांच्या शिक्षणाचे नाव काढायला नको. तरीही राजघराण्यातील सरदार घराण्यातील मोजक्या स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था घरीच केली जायची. राजे लखुजींनी, दत्ताजी, अचलोजी, बहादुरजी, राघुजी या चार पुत्रा बरोबर पाचव्या एकुलत्या एक लाडक्या लेकीच्या शिक्षणासाठी शिक्षकाची नेमणूक केली.

ते त्यांना संस्कृत आणि गणित शिकवायचे ! जिजाऊ लहानपणापासून चुणचुणीत चाणाक्ष बुध्दीच्या होत्या. शिक्षक बाळ जिजाऊला शिकवायला नेमाने येत, पण ते थोडया वेळासाठी ! दिवसभराचा जिजाऊंचा सारा वेळ त्यांची आई म्हाळसाराणी साहेबासोबत जायचा ! आई ही पहिली शिक्षिका या न्यायाने म्हाळसाराणी जिजाऊला आपल्या मराठा पूर्वजांनी विजयनगर आणि देवगिरीचे मोठे राज्य कसे उभारले. त्यांच्या राज्यात रयत कशी सुखी होती हेही समजावून सांगायच्या ! मराठ्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर रयतेसाठी बळीचं राज्य उभं करायचे स्वप्न बोलून दाखवायच्या. जिजाऊ रोज रात्री म्हाळसा आईच्या मांडीवर डोके ठेवून पराक्रमी कथा ऐकत ऐकत त्या झोपेच्या अधीन व्हायच्या. जिजा या शब्दाचा अर्थ जिजाऊला सांगतांना म्हाळसाराणी भावुक व्हायच्या ! जिजा म्हणजे जय- विजय ! विजयगाथा रचणारी ती जिजा असं सांगून तिचा आत्मविश्र्वास आणि महत्वकांक्षा फुलवायच्या.

जिजाऊला घडविण्यात त्यांची माता पिता अनुक्रमे म्हाळसाराणी व राजे लखुजी जाधव यांचा जेवढा वाटा आहे, तितकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त वाटा त्याकाळच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचाही आहे. जिजाऊ हया लहानपासून अत्यंत हुशार परिस्थितीचे योग्य आकलन करण्याची त्यांची कुवत दांडगी आणि अनुभवातून शहाणपण शिकवण्याचा त्यांचा वकुब दांडगा होता. अशा माणसांची जग ही शाळा असते आणि अनुभव हा गुरु असतो. जिजाऊनेही अनुभव हा गुरु मानून परिस्थितीला टक्कर देत स्वत:चे शिक्षण स्वत:च केले ! आणि त्यांची पिढी घडवणाऱ्या राजमाता आणि लोकमाता बनल्या.

पुढे सन १६१० -११ च्या सुमारास मालोजीराजे भोसले यांचे शूर पराक्रमी पुत्र शहाजीराजे यांच्या सोबत शाही विवाह झाला. या विवाहासंबंधी रविंद्र परमानंद आपल्या शिवभारत ग्रंथात खालील मजकुर लिहितो, उत्तम लक्षणांनी युक्त , दानशील, दयाशील, युध्दकुशल अिाण महातेजस्वी अशा मालोजीपुत्र, शहाजीस पाहून कुबेरागत श्रीमंत जाधवरावांनी कमलनेत्रा आणि कुशल शोभा आणणारी कुलवंत कन्या जिजाऊ शहाजीस अर्पण केली.

जगातील आदर्श माता पिता जिजाऊ शहाजीराजेच्या पोटी जगातला शुरवीर, महापराक्रमी , सर्वगुण संपन्न राजा छ. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर झाला. या पुत्राच्या माध्यमातून जिजाऊं मॉं साहेब यांनी रयत, राज्य नि राज्यधर्मासाठी आपले जीवन चंदनासारखे उगाळले. मेणबत्तीसारखे जाळले आणि प्रकाशित ठेवले. त्यांनी ईश्र्वर माणसात पाहिला. रयतेत अनुभवला त्या ईश्र्वराचीच त्यांनी नित्य पूजा केली. देवळात देव असतो ही धारणा लोकभावनेचा आदर करण्यासाठी त्यांनी स्वीकारली होती.‌

ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी, अनुभवावा हा तुकाराम महाराजांचा देवाविषयीचा मुलगामी विचार त्यांनी मनी पक्का रुजविला होता. जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधू वोळखावा । देव तेथेचि जाणावा ।। हया विचारानेच जिजाऊनी शिवाजीराजेंना प्रभावित केले होते आणि तसेच वर्तन त्यांच्याकडून झाल्याने शिवाजीराजे हा नवयुग निर्माता असल्याची लोकभावना त्यांनी स्वीकारली होती. ती लोकभावना शिवाजीराजेंनी प्रत्यक्ष व्यवहारात उतरविली होती. थोडक्यात जिजाऊ शिवाजीराजेंना ईश्र्वर रयतेत दिसला, भेटला आणि स्वराज्य स्थापनेकामी तोच ईश्र्वर त्यांना कामाला आला. कर्तव्य हाच तर आपला धर्म आहे.

ध्येयासाठी अविरत प्रयत्न हीच तर आपली पूजा मानवता, माणुसकी जपली पाहिजे, रयतेला जपलं पाहिजे, एवढं केलं तरी वेगळया देव-देवतांची पूजा करणे आवश्यक नाही, उठ सूठ आम्ही मंत्र-तंत्र, यज्ञ-याग, अनुष्ठानादि कर्मकांडात वेळ घालवू लागलो तर स्वराज्य उभारणीचं कार्य पूर्ण कसं होणार? सुवर्णमूर्ती वितळवून त्याचा पैसा रयतेच्या कामी लावा या जिजामातेच्या क्रांतीकारी, बुध्दिनिष्ठ युगपरिवर्तनकारी आदेशानुसार सुवर्णमूर्ती वितळून टाकण्यात आल्या. युगस्त्री जिजामाता खऱ्या स्वातंत्र्योपासक होत्या म्हणूनच त्यांना स्वच्छ मनाने अत्यंत धाडसी निर्णय घेता आला. छत्रपती शिवराय आपल्या मातोश्रींच्या शुध्द इहवादी विचारसारणीत तयार झाले म्हणून तर बहुजनांचे स्वराज्य स्थापन झालं.

राजमाता लोकमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई यांच्या प्रेरणा घेऊन भारतीय महिला आता जागृत होऊ लागल्या आहेत. शिक्षण घेऊ लागल्या आहेत. शिक्षणात गुणवत्तेने पुरुषापेक्षा सरस ठरत आहेत. जीवनाच्या जवळजवळ सर्वच क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून यशस्वीरित्या कामे करु लागल्या आहेत. त्या आता अबला राहिलेल्या नाहीत. सबला बनत आहेत. तरीही स्त्रियांचे सबलीकरण होण्याचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे, असे होणे हीच राष्ट्रमाता जिजाऊंना खरी आदरांजली ठरेल !

रमेश पवार
लेखक,व्याख्याते-बहीशाल शिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.