राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती

राजमाता जिजाऊंचा वाडा व समाधी संवर्धन अंतिम टप्प्यात वाडा ते समाधीदरम्यान ८८ एकरांवर साकारणार शिवसृष्टी

0

रयतसाक्षी: तमाम मातृशक्तीचे प्रेरणास्थान व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या समाधीपाशी लिहिलेल्या या ऐतिहासिक अक्षरांना नावीन्याची झळाळी मिळत आहे. रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरातील ऐतिहासिक नमुन्यानुसार त्यात काळ्या बेसाल्टमध्ये घडवलेली आठशे मीटरची फरसबंद समाधिस्थळी बांधून तयार झाली आहे. पाचाडच्या जिजाऊंच्या वाड्याच्या संवर्धनाचे कामही सुरू झाले आहे.

वाडा ते समाधी या पुरातत्त्व वास्तूंमधील ८८ एकर जमीन संपादित करण्यात आली असून त्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावर चढण्यापूर्वी, स्वराज्याचे बीज ज्यांंच्या कुशीत रुजले त्या राजमाता जिजाऊंना अभिवादन करून, शिवभक्त आणि पर्यटक शिवकालीन इतिहास जाणून घेण्यास प्रारंभ करतील या भूमिकेतून रायगड विकास प्राधिकरणाने रायगडाच्या पायथ्याजवळील “माँसाहेबांचा वाडा’ आणि “समाधिस्थळ’ या शिवकालीन ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन सुरू केले आहे.

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात कार्यरत प्राधिकरणाच्या या कामाने गेल्या चार वर्षांत वेगवान प्रगती केली असून तीन एकरांतील समाधिस्थळ आणि चार एकरांतील वाडा यांच्या संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

आज मर्यादित संख्येत शासकीय पूजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव पन्नास जणांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरूपात होत आहे. बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते आज जन्मस्थळी सूर्याेदयी शासकीय पूजन होईल. त्यानंतर अन्य संस्था-संघटनांतर्फे कार्यक्रम होतील.

ऐतिहासिक मूल्य राखून जतन व संवर्धन
दुर्गराज रायगडावर येणारे शिवभक्त पाचाड येथील राजमाता जिजाऊसाहेबांचा वाडा व समाधी पाहण्यासाठी येत असतात. परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. जिजाऊंच्या वाड्याचे व समाधीचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून, त्याचे जतन व संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रायगडाच्या माथ्यावर पुरातत्त्व खात्याच्या कडक निर्बंधांमुळे जे शक्य नाही ते सर्व या ८८ एकर जागेवर करण्यात येणार आहे. यामध्ये माहिती केंद्र, मराठा इतिहास संशोधन केंद्र, अद्ययावत वस्तुसंग्रहालय ते स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी व्यापारी संकुल असे बरेच काही असेल. इतिहासाच्या अभ्यासकांना उपयोगी पडेल असे ग्रंथालयसुद्धा या ठिकाणी उभारण्याचा आमचा मानस आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले, अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.