पिस्टलचा धाक दाखवून दरोडा टाकणार-या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपींकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

0

हिंगोली, रयतसाक्षी : शहरातील बियाणी नगर येथे ( दि.३०) डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पिस्टलचा धाक दाखवून धाडसी चोरी करणा-या आरोपींना हिंगोली पोलीसांनी अटक केले आहे . आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या पिस्टल, जिवंत काडतुस चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची माहिती हिंगोलीचे पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.


बियाणी नगर येथील अंजली अविनाश कल्याणकर यांच्यावर दरोडेखोरांनी चाकूने वार करून जखमी करुन सोन्याचे दागिने, रोक रक्कम असा एकूण २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेतील आरोपी १)चंद्रकांत लिटर काकडे २) नचिकेत राजकुमार वाघमारे यांना पोलिसांनी अटक केले आहे. दरम्यान, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्टल, एक जिवंत काडतूस मोटरसायकल, मोबाईलसह चोरीचे सोन्याचे दागिने,‌रोक रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्याची माहिती
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सबंधीत गुन्ह्याच्या तपासाचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपी चंद्रकांत दिनकर काकडे यास हिंगोलीतून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदर आरोपी हा एका पार्सल कंपनीचा कर्मचारी असल्याचे समजले.

चंद्रकांत काकडे हा पार्सल देण्यासाठी बियाणी नगर येथील फिर्यादी महिला अंजली कल्याणकर यांच्या घरी नेहमी जात होता. चंद्रकांत याने घरातील संपूर्ण माहिती त्याचा मित्र नचिकेत राजकुमार वाघमारे यास सांगून दरोडा टाकण्याची योजना आखली. त्यानुसार या दोन्ही आरोपींनी दिनांक 30 डिसेंबर रोजी भरदिवसा पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी महिला व त्यांच्या दोन लहान मुलांचे हातपाय बांधून घरातील रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले.

या घटनेतील दोन्ही आरोपींना हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, तसेच पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, भगवान आडे, नितीन गोरे, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे, शेख जावेद, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन, सुमित टाले, इरफान पठाण, जयप्रकाश झाडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा तसेच सायबर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने दरोडा प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.