हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

वरिष्ठ सहाय्यकासह, कार्यालयीन अधिक्षक चतुर्भुज

0

हिंगोली, रयतसाक्षी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधिक्षकास एकूण 23 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना आज दिनांक 13 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाई एसीबीच्या पथकाने शहरातील जिल्हा परिषद कार्यालय परिसरात केली.

सविस्तर माहिती अशी की, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने एक जादा वेतनवाढीचा मंजूरी आदेश काढल्याचा मोबदला तसेच मंजुरी आदेशाची प्रत देण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक सचिन अजाबसिंग अडबलवार यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच कार्यालयीन अधिक्षक संतोष उर्फ अण्णा किशनराव मीसलवार यांनी मंजुरी आदेशाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी मोबदला म्हणून तीन हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीअंती सचिन अडबलवार यांना वीस हजार रुपये तसेच संतोष मीसलवार यांना तीन हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने पडताळणी केली.

आज दिनांक 13 जानेवारी रोजी एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई करून सचिन अडबलवार यास वीस रुपये तर संतोष मीसलवार यास तीन हजार रुपये अशी एकूण 23 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांनाही रंगेहात पकडले. याप्रकरणी वरील दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक निलेश सुरडकर यांनी व त्यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.