शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस बंद करू नयेत !

विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यासात परिश्रम घेतलेला आहे

0

नांदेड, रयतसाक्षी: सध्या जानेवारीचा महीना सुरु असून पुढील दोन महिन्यात दहावी आणि बारावी तसेच विद्यापीठ व इतर परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यासात परिश्रम घेतलेला आहे तसेच पालकांनी देखील पाल्यांच्या शिक्षणावर मोठी कसरत केलेली आहे.

अशावेळी शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद करून देणे योग्य होणार नाही. शासन निर्धारित निर्बंधांच्या अनुपालनां मध्ये शिक्षणप्रवाह सुरु ठेवण्यात यावा असे आवाहन वरिष्ठ पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांनी येथे शोशल मीडिया वर प्रसिद्धीस दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

स. रवींद्रसिंघ मोदी यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र शासन सध्या कोरोना आणि ओमीक्रॉन संक्रमणाशी लढण्यासाठी सक्षम आणि तत्पर आहे. मा. मुख्यमंत्री आणि मा. आरोग्य मंत्री यांच्या नेतृत्वात शासनाकडे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. राज्यात लसीकरणाचे कार्य देखील समाधानकारक असे झालेले आहे. 15 ते 18 वयोगतातील विद्यार्थ्यांचे शतप्रतिशत लसीकरण देखील गरजेचे आहे.

अशा वेळी शाळा व महाविद्यालय बंद करणे योग्य आहे काय याचा विचार शिक्षण विभागाने करणे गरजेचे वाटते. मागील दोन वर्षात शाळा व महाविद्यालय वेळोवेळी बंद केल्यामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठे नकारात्मक परिणाम झालेले आहेत. अनेक लहान शाळा, बालवाडया बंद पाडल्या आहेत. सुशिक्षित लोकांपुढे आर्थिक संकट उभा आहे. अनेकांनी आपला रोजगारही गमावलं आहे. अशा परिस्थितीचे शासनातर्फे गंभीरतेने विवेचन करणे गरजेचे आहे.

शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांत मोबाइल वापराची वृत्ति वाढली आहे. घरी राहणाऱ्या मुलांना व्यायम व खेळण्यासाठी योग्य संधी मिळत नाहीत. शासनाने किंवा शिक्षण विभागाने कोरोना संक्रमणाविषयी दक्षता बाळगण्यासाठी नव्याने नियम अमलात आणून शाळेत शिक्षण कसे देता येईल त्याविषयी योजना हाती घ्यावी. अशी विनंती रवींद्रसिंघ मोदी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.