हिंगोली पोलिसांची आणखी एक धाडशी कारवाई

आंबाचोंडी येथील बँक लुटणाऱ्या पिस्टलधारी दरोडेखोरांच्या बोथी शिवारात मुसक्या आवळल्या

0

हिंगोली, रयतसाक्षी: जिल्ह्यात पिस्टलचा धाक दाखवून दरोडा टाकणा-या आरोपींच्या गुरुवारी (दि.१३) मुसक्या आवळल्या नंतर आज शुक्रवारी (दि.१४) हिंगोली पोलीसांनी बॅंक लुटणा-या पिस्टलधारी दरोखोरांच्या अवघ्या दोन तासात‌ मुसक्या आवळून २४ तासात पुन्हा एक धाडशी कारवाई केली आहे.

वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथे ( दि.१४) जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तीन बंदूकधारी दरोडेखोरांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी कुरुंदा पोलीस, आखाडा बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली असे तीन स्वतंत्र पथक स्थापन करून वेगवेगळ्या दिशेने दरोडेखोरांचा पाठलाग करण्यासाठी पाठविले. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोथी शिवारात तिन्ही दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

पोलीस अधीक्षक हे स्वतः घटनास्थळी हजर झाले होते. बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंदूकधारी दरोडेखोरांच्या पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या. या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. विशेष म्हणजे गुरुवारी (दि १३) जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात दरोडा टाकणाऱ्यांना अटक केले. आज पुन्हा हिंगोली पोलिसांनी बंदूकधारी दरोडेखोरांचा पाठलाग करून आरोपींना पकडले आहे. त्यामुळे हिंगोली पोलिसांचे कौतुक होत आहे.

या विशेष कामगिरीमुळे महाराष्ट्रचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे अभिनंदन केल्याची माहिती मिळाली आहे. दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, कुरुंद्याचे ठाणेदार सुनील गोपीनवार, बाळापूरचे ठाणेदार बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड, नितीन केनेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह सर्व पोलीस पथकांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.