राज्यात पुन्हा सुदामा मुंढे? कदम हाॅस्पीटलच्या बायोगॅस खड्डयात कवट्या, हाडे

वर्धा जिल्ह्यात गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

0

रयतसाक्षी: महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली असून गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून बीड जिल्ह्यातील सुदाम मुंढे प्रकरणाच्या आठवणी पुहा एकदा जाग्या झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील ही घटना असून एका १३ वर्षीय मुलीच्या गर्भपातामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे . डॉ. रेखा कदम असे गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरचे नाव असून रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू संगीता काळे ही सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

 

पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पथक आणि पालिका पथकाला पाचारण करुन डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेले भ्रुण अवशेष देखील आढळून आले. पोलिसांनी डॉ. रेखा कदमसह मुलाच्या आईवडिलांना अटक केली होती तर मुलगा अल्पवयीन असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. कदम रुग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले असता भ्रुण अवशेष आणि काही हाडे आणि गर्भपिशवी आढळून आली. डॉ. रेखा कदम सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरु आहे.

कदम हिच्या रुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता मात्र सध्या तो खड्डा वापरात नसल्याने यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार असून सदर हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच समोर येणार आहे.

काय आहे प्रकरण ?
आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. मुलगा साडे सतरा वर्षांचा आहे तर मुलगी १३ वर्षांची आहे. त्यांच्यात शारीरिक संबध प्रस्थापित होऊन मुलीला गर्भधारणा झाली मात्र कुठे वाच्यता नको म्हणून गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. शहरातील प्रसिद्ध डॉ. रेखा कदम हिने मुलीचा गर्भपात केला मात्र पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी भल्या सकाळी डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आणि या केसमधील इतर आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मुलाच्या वडिलांनी पीडितेच्या आई वडिलांना रस्त्यात अडवून पीडितेचा गर्भपात करण्यास आम्ही पैसे लावू मात्र याची वाच्यता पोलिसांकडे केल्यास सर्व गावात बदनामी करु, असे धमकाविले होते त्यानंतर डॉ.रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला.आर्वी पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रीच कारवाईसाठी तयारी सुरु केली होती त्यानुसार रात्री घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर पाळत ठेवून डॉ. रेखा कदम हिला सकाळीच अटक केली तर मुलाच्या आई आणि वडिलांना देखील अटक करण्यात आली आणि अल्पवयीन मुलास देखील ताब्यात घेण्यात आले.

दोषींवर कडक कारवाई व्हावी -उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याने राज्यात तसंच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात वर्धा जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र लिहिलं असून यामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला चाकणकरांनी दिले आहेत.
या प्रकरणात आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मदत करणारे, त्यांचे साथीदार यांचा शोध घेवून त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी. कायदेशीर गर्भपात करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती असते. या समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीमार्फत नियमित होणे गरजेचे आहे.महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत अख्यात्यारित येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयातील ‘जैव वैद्यकीय कचरा’ किती होतो, किती प्रमाणात गोळा केला जातो याबाबतचा तपशील, अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी संबंधित प्रशासनाला द्यावा. पिडितेला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

चाकणकरांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ?
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताची घटना उघडकीस आल्यानंतर ५ आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या बायोगॅस प्लॅन्टच्या जागेत ५ मृत अर्भकांच्या कवट्या आणि हाडांचे अवशेष सापडले आहेत. ही बाब अतिशय धक्कादायक आणि डॉक्टरी पेशाला व माणुसकीला काळीमा फासणारी आहे.

सदर घटनेचा खोलवर तपास करून यामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. तसेच भविष्यात अशा घटना घडूच नये यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात आलेले आहेत, असं चाकणकरांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.