अवैध गर्भपात प्रकरण :आर्वीतील ‘ते’ सर्व गर्भपात स्त्री भ्रूणहत्येचाच प्रकार?

सर्व भ्रूण १४ आठवड्यांवरील; उपजिल्हा रुग्णालयातून औषधाचा पुरवठा!

0

वर्धा , रयतसाक्षी: जिल्ह्यातील आर्वी येथे उघडकीस आलेल्या भ्रूणहत्येच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संबंधित खासगी रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीत आढळलेले मानवी अवशेष हे १४ आठवड्यांवरील भ्रूणांचे असावेत, असे सांगितले जात असून त्यात बहुतांश स्त्रीभ्रूण असावेत, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. कायदेशीर गर्भपातासाठी वापरले जाणारे मिजो प्रॉस्ट हे औषध या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयातून पुरवण्यात आले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

आर्वी येथे अल्पवयीन मुलीच्या गर्भपातप्रकरणी कदम रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम यांना अटक करण्यात आल्यावर पोलिस पथकाला रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी ११ मानवी कवट्या आणि मांसाचे ५४ तुकडे आढळले होते. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात एक रॅकेट सक्रिय असल्याचे तपासातून उघड झाले आहे. अकरा भ्रूणांचे अवशेष मिळाले असले, तरी या रुग्णालयात आजवर अनेक भ्रूणहत्या झाल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशिष्ट परिस्थितीत १२ आठवड्यांपर्यंतच्या गर्भपाताला कायदेशीर प्रक्रियेनंतर मान्यता दिली जाते. मात्र, या प्रकरणात आढळलेले मानवी अवशेष १४ आठवड्यांवरील अर्भकांचे असावेत आणि त्यातही बहुतांश स्त्रीभ्रूण असू शकतात, असे सांगितले जात आहे. कायदेशीर गर्भपातासाठी वापरले जाणारे मिजो प्रॉस्ट हे औषध फक्त शासकीय रुग्णालयात उपलब्ध होते. या औषधाच्या वापरातून कदम रुग्णालयात गर्भपात झाले असतील, तर ते उपजिल्हा रुग्णालयातून मिळवण्यात आले असू शकते. त्यामुळे आरोपी डॉ. रेखा कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भ्रूणहत्येचे रॅकेट चालवल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुन्हा पाच तास खोदकाम
कदम रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीमध्ये गुरुवारी मानवी अवशेष आढळून आल्यानंतर शुक्रवारी पुन्हा पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने रुग्णालय परिसरात पाच तास खोदकाम केले. त्यातून हाडाचा एक तुकडा आढळून आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.

प्रशासकीय समितीने तपासणीच केली नाही
ज्या सोनोग्राफीच्या आधारे गर्भपात केले जातात त्याच्या संबंधित रुग्णालयातील नोंदींची वर्षातून तिनदा तपासणी व्हायला हवी. परंतु, ती तपासणीच झालेली नाही. – डॉ. आशा मिरगे, पीसीपी एनडीटी समितीच्या राज्य सदस्या.

ड्रग्ज आढळले नाही
गर्भपात झाल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कदम रुग्णालयात तपासणी केली. मात्र तिथे त्यासाठी वापरले जाणारे ड्रग्ज आढळून आले नाही. – डॉ. मोहन सुटे, शल्यचिकित्सक, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.