राजकीय:गरज पडल्यास मंत्री धनंजय मुंडें विरुद्ध लढणार- करुणा मुंडे

महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ‘शिवशक्ती पक्ष’

0

रयतसाक्षी: महाराष्ट्रातील महिलांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच्या उद्देशाने शिवशक्ती पक्षाच्या स्वरूपात राज्यभर लढा उभारत आहोत. गरज पडली तर आपण परळी मतदारसंघातून थेट धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे करुणा धनंजय मुंडे यांनी वाळूज परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

त्या म्हणाल्या की, औरंगाबाद शहरात १८ जानेवारी रोजी कायदेशीर मार्गाने विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी व मेळावा घेण्याचे नियोजन केलेले होते. पण सत्तेचा दुरुपयोग करून काही राजकीय पुढाऱ्यांनी नियोजित कार्यक्रम घेण्यास अडथळा आणला.

मी संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवशक्ती पक्षाचे संघटन मजबूत करणार आहे. एका महिलेला घाबरून तिचे मेळावे, बैठका रद्द करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना भविष्यात आमनेसामने होणाऱ्या सभांना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक पती त्याच्या पत्नी व दोन मुलांना तुरुंगात टाकतोय हे पहिल्यांदाच घडत असणार, असे पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी म्हटले. महिलांवरील अन्यायाविरुद्ध मी स्वतः महिलांसाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने पुढे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार पक्षाच्या स्वरूपात लढा उभारत असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी सचिन डोईफोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.