राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मात्र सरशी महाविकास आघाडीची

नगरपंचायत निवडणूक आघाडीत राष्ट्रवादीला अधिक फायदा, काँग्रेस तिसऱ्या स्थानी, शिवसेना जैसे थे

0

रयतसाक्षी : राज्यातील ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये बुधवारी भाजपने राज्यभरात सर्वाधिक जागा मिळवल्या मात्र एकूण जागांची गोळाबेरीज करता सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकतील निकालाचीच नगरपंचायतमध्येही पुनरावृत्ती घडण्याची शक्यता आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील १०६ नगर पंचायतींसाठी दोन टप्यांमध्ये मतदान झाले.

त्याचा निकाल बुधवारी जाहिर झाला. यामध्ये सर्वाधिक ३८४ जागा भाजपने पटकावत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३४४ जागा जिंकून दुसरा क्रमांक प्राप्त केला. काँग्रेसला ३१६ जागा मिळाल्या असून राज्यात महाविकास आघाडीचे सारथ्य करत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकाच्या २८४ जागा मिळवता आल्या आहेत.

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्यामुळे गाजलेल्या या निवडणुकीवर कोरोनाचेही विघ्न होते परंतु राज्यभरात भरभरून मतदान झाले. राज्यातील १०६ नगर पंचायतींमधील १ हजार ८०२ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. यापैकी ९७ नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन १ हजार ६४९ जागांपैकी १ हजार ६३८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले.

ही निवडणूक चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. दरम्यान, भाजप पुन्हा नंबर वन पक्ष असल्याचे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली..तर भाजपला राज्यातील जनतेने नाकारले असून एकूण ८० टक्के जागा महाविकास आाघाडीच्याच पारडयात पडल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी सुसाट

२०१४ ते १८ दरम्यान पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. पहिला क्रमांक भाजपचा तर दुसरा मोठा पक्ष काँग्रेस होता. यावेळी मात्र राष्ट्रवादीने आपली कामगिरी सुधारली असून काँग्रेसला मागे खेचत दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिवसेना मागच्या वेळी चौथ्या क्रमांकावर होती.

बीडमध्ये ५ पैकी ३ नगर पंचायती भाजपकडे, इतरत्र आघाडीचा झेंडा
नगर पंचायत निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले. बीड जिल्ह्यात पाचपैकी आष्टीसह पाटोदा, शिरूर नगरपंचायतींवर भाजपचे वर्चस्व राहिले. या ठिकाणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रचार केला मात्र आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दमदार यश मिळवले.

औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिष्ठेची बनवलेल्या सोयगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली होती. याआधी येथे भाजपची सत्ता होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात म्हणजे जालन्यात ५ नगरपंचायतीत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले. येथे ८५ पैकी ३४ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. शिवसेनेला २२ तर भाजपला १४ जागा मिळाल्या.

नांदेड व लातूरमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने बाजी मारता आली. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत ५१ पैकी ३३ जागी काँग्रेसची सरशी झाली. लातूर जिल्ह्यात ४ नगरपंचायतींच्या तर भाजपला ७८ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनेही चांगली कामगिरी करत ६४ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेने ४६ जागा मिळवल्या. अपक्ष व इतर पक्षांना ६६ जागा मिळाल्या. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगर पंचायतीवरील वर्चस्व कायम ठेवले.

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा मिळवण्यात यश संपादन केले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसच्या तीन जागा वाढल्या आहेत. मात्र खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मावळत्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा भाजपच्या तरुण नवख्या उमेदवाराने प्रचंड मताने पराभव केला.

बहुमतासाठी २७ हा जादुई आकडा काढण्यासाठी काँग्रेस अपक्ष, शिवसेना, बसपा, वंचित यांना हाताशी घेते की राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी करते हे आता बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

दिग्गजांचे काय झाले?

रावसाहेब दानवे, सोयगाव
सोयगाव नगरपंचायतीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावूनही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपची सत्ता टिकवता आली नाही. तिथे अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली.

नपंची आज मतमोजणी
गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. तर शिर्डी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण १७ पैकी ११ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने तेथे मतदान होऊ शकलेले नाही आहे.

एकनाथ खडसे, बोदवड
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वर्चस्वाला त्यांचे राजकीय हाडवैरी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटीलांनी धक्का दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.