क्रुरतेचा कळस; बहिणीचे शिर धडावेगळे करत हातात धरून म्हणाला….

औरंगाबादचे सैराट पुनरावृत्ती प्रकरण

0

 

औरंगाबाद, रयतसाक्षी: कुटुंबीयांचा विराेध डावलून कीर्ती ऊर्फ किशोरी अविनाश थोरे (२०) हिने गावातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. याचा संताप अनावर झाल्याने धाकटा भाऊ व आईने सासरी जाऊन तिची निर्घृणपणे हत्या केली. “प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला मी जिवंत सोडणार नाही…’ असे लहान भावाने सहा महिन्यांपूर्वी सर्वांसमोर म्हटले होते. रविवारी दुपारी कोयत्याने अक्षरश: तिचे शिर धडावेगळे करून घराबाहेर सासरच्या लोकांना दाखवले व “अखेर तिला संपवले…’ असे तो जोरजोरात ओरडू लागला.

कीर्तीची आई शोभा संजय मोटे (४२) व धाकटा भाऊ संकेत संजय मोटे (१८ वर्षे ७ महिने) हे दोघे तिला भेटण्यासाठी सासरी वैजापूर तालुक्यातील गोयेगावच्या लाडगाव शिवार वस्तीवर गेले होते. भाऊ व आई आल्याने ती आनंदित झाली. चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात जाताच तिच्यावर निर्घृणपणे सपासप वार करण्यात आले.

दरम्यान, कीर्ती व अविनाश थोरे एकाच महाविद्यालय शिकायला हाते. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेम झाले. मोटे कुटुंबात कीर्ती एकटी मुलगी होती. अविनाशसोबत प्रेमविवाह करण्यासाठी तिने कुटुंबातील सदस्यांचा तीव्र विरोध पत्करला व त्याच्यासोबत आळंदी येथे जात विवाह केला. दोघेही सज्ञान असल्याने तिने वैजापूर पोलिस ठाण्यात प्रेमविवाह केलेल्या अविनाश थोरेसोबत राहण्याची ठाम भूमिका घेतली.

त्यामुळे तिची मनधरणी करणाऱ्या आई व भावाची मोठी निराशा झाली. या प्रकरणात गावातील अनेकांनी मध्यस्थी केली. पण ती निर्णयावर ठाम होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कीर्ती दोन महिन्यांची गर्भवती होती. आठ दिवसांपूर्वी किशोरीची आई शोभा तिला सासरी भेटून गेली. त्यानंतर रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संकेतला सोबत घेऊन तिला भेटण्याच्या बहाण्याने पुन्हा आली व तिचा खून केला.

पोलिस पाटील सूर्यकांत मोटे यांनी ही घटना पोलिसांना कळवली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, वीरगावचे सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांच्यासह पोलिस पथकाने धाव घेऊन पंचनामा केला.

कांदे लावण्याचे काम अर्धवट सोडून गेली घरात
धाकटा भाऊ पहिल्यांदा घरी आला म्हणून कीर्ती खूप आनंदात होती. ते दोघे आले तेव्हा ती सासू व आजीसोबत कांदे लावण्याचे काम करत हाेती. त्यांना पाहून तिने ते काम बाजूला ठेवत चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाताच तिच्यापाठोपाठ आई व लहान भाऊ गेले. जॅकेटमध्ये लपवलेल्या धारदार कोयत्याने त्याने सपासप वार केले व तिचे मुंडके धडावेगळे केले.

त्यानंतर एका हातात कोयता व दुसऱ्या हातात मृत बहिणीचे मुंडके घेऊन घराच्या ओट्यावर त्याने “आमच्या मनाविरुद्ध तिने लग्न केल्यामुळे आम्ही तिला तुमच्या घरात मारून टाकले..’ असा जोरजोरात ओरडू लागला. सर्वांना शिर दाखवले व ते घराच्या पायरीवर ठेवले व नंतर आईला सोबत घेऊन त्याने वैजापूर पोलिस ठाणे गाठले व खुनाची कबुली दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.