हंगेवाडीत चुलतीचा डोक्यात दगड घालून खून , पुतण्या फरार

दारूच्या नशेत पुतण्याची पत्नी , चुलीला मारहाण

0

रयतसाक्षी, केज: पुतण्याने चुलतीच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना केज तालुक्यातील हंगेवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली. पुतण्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. राजू शिंदे असे आरोपीचे नाव आहे. केज तालुक्यातील नांदूरघाटपासून हंगेवाडी हे गाव जवळ आहे. हंगेवाडी शिवारातील गायरान जमिनीत पारधी पेढीवरील मृत सखुबाई बन्सी शिंदे (६०) या महिलेची दोन्ही मुले कुटुंबासह ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर स्थलांतरित आहेत. पेढीवर ही महिला वयोवृद्ध सासूसह वास्तव्यास आहे. तिच्या शेजारी तिचा पुतण्या राजू ऊर्फ टुल्या बन्सी शिंदे हा कुटुंबासह राहतो.

राजू याला गांजा व दारूचे व्यसन असल्याने नशेत तो नेहमी पत्नीला शिवीगाळ करून भांडणे करीत होता. शुक्रवारी ही दुपारपासून राजू हा दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण करीत होता. तर चुलती सखुबाई यांनाही शिवीगाळ करून त्याने लाथ मारली होती. तो रात्री उशिरापर्यंत पत्नी व चुलतीला शिवीगाळ करीत होता. त्याने दारूच्या नशेत पत्नी व चुलतीला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यातच त्याने दगड उचलून सखुबाई शिंदे यांच्या डोक्यात मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राजू ऊर्फ टुल्या शिंदे हा घटनास्थळावरून फरार झाला.

शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केजचे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार दादासाहेब सिद्धे, जमादार शिवाजी शिनगारे, पोलिस नाईक मतीन शेख, नांदूरघाटचे पोलिस चौकीचे जमादार अशोक मेसे, भालेराव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी केली असता दारूच्या नशेत राजू शिंदे याने चुलती सखुबाई शिंदे या महिलेचा खून केल्याचे समोर आले.

राजू शिंदे याची पत्नी मुले घेऊन शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आली होती. मात्र ती उपचार न घेता निघून गेल्याची माहिती रुग्णालयातून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

श्वानपथकाला पाचारण
पोलिसांनी घटनास्थळी बीडचे श्वान पथक पाचारण केले होते. तर घटनास्थळी महिलेस डोक्यात मारलेला दगड होता. मात्र इतर वस्तू आढळून न आल्याने श्वानालाही आरोपीचा माग काढता आला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.