नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता:रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्षपद ?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

0

रयतसाक्षी : कवठेमहांकाळ नगरपांचयत निवडणुकीत स्वत:च्या बळावर राष्ट्रवादीची सत्ता खेचून आणणाऱ्या रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

युवक राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष यांची कारकीर्द काहीशी वादादीत झाली आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपवण्यासंदर्भात अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचे नाव सुचवले आहे. आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

 

रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळमधील पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पराभूत करीत खासदार संजय पाटील यांना त्यांच्या सात वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच काटशह दिला आहे. आणि मुख्यत्वे तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात त्यांच्याकडे उद्योन्मुख नेतृत्व म्हणून आता पाहिले जात आहे.

आगामी विधानसभेत रोहित यांना विधानसभेचे तिकीट ?% सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला रोखण्याची जबाबदारी देण्यासाठी रोहित पाटील यांना राजकीय बळ मिळावे, यासाठीच त्यांच्या नावाची शिफारस युवकांच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी करण्यात आली आहे. सध्या रोहित हे अवघ्या २३ वर्षांचे आहेत.

आगामी निवडणूका ज्या वेळी होतील त्या वेळी ते २५ वर्षाचे होत आहेत. त्यामुळे आर.आर. यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्याऐवजी रोहितलाही विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. ही समीकरणे लक्षात घेऊन त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच रोहित यांच्याकडे युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

 

पक्ष नेतृत्व त्यांना योग्य ती संधी देईल : जयंत पाटील
सांगली जिल्ह्यात विषेशतः तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात गेल्या सात वर्षांपासून भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पकड मजबूत केली होती. गेल्या दोन वर्षांपासून रोहित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर तो युवकांची मोर्चेबांधणी करत होता.

 

आपल्या मेहनतीने व राजकीय विचाराने तो युवकांचा ऑयडाॅल बनला आहे. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची छाप रोहित मध्ये आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व युवा नेते रोहित पवार यांनी रोहित पाटील यांना युवक अध्यक्षपदी नियुक्तीसाठी पक्षांपुढे मत व्यक्त केले आहे. पक्ष नेतृत्व त्यांना योग्य ती संधी लवकरच देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.