करार केले तरी व्याज द्यावेच लागेल आयुक्तांनी कारखानदारांना सुनावले

व्याज न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कार्यवाही करा -प्रल्हाद इंगोले

0

रयतसाक्षी, पुणे : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत करार करून तीन टप्प्यांत एफआरपी दिली तरीही त्यांना विलंब एफआरपीचे व्याज द्यावेच लागेल असे खडेबोल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज पुणे येथे झालेल्या सुनावणीत कारखानदारांना सुनावले.२०१४-१५ चे व्याज देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणार्या कारखान्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी याचिकाकर्ते तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली.

२०१४-१५ साली उशीरा दिलेल्या एफआरपीचे व्याज शेतकऱ्यांना मिळावे यासाठी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतील आदेशानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नांदेड विभागातील वीस कारखान्याकडे ३७ कोटी रुपये व्याज आकारणी निश्चित करून ते पैसे शेतकर्यांना द्या अन्यथा कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्या बाबत नोटीस दिली होती.

परंतु अद्याप एकाही कारखान्याने व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही .त्यामुळे आज साखर कारखानदारांची सुनावणी घेण्यात आली त्यात अनेक कारखानदारांनी कायद्यातील पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु याचिकाकर्ते इंगोले यांनी केंद्र सरकारने हायकोर्टात दाखल केलेले शपथपत्र सादर केले. त्यानंतर साखर आयुक्तांनी कारखानदारांना स्पष्ट शब्दात खडसावत तुम्ही शेतकऱ्यांसोबत करार केले तरी त्यांना चौदा दिवसांनंतर देण्यात येणार्या एफआरपी रकमेवरील विलंब व्याज द्यावेच लागेल असे स्पष्ट केले.

कारखानदारांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात दिले. त्यामुळे साखर कारखानदार बऱ्यापैकी धास्तावले असले तरीही ते व्याजाची रक्कम शेतकर्यांना देतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे .

मा. न्यायालयाचा अवमान नको
विलंब व्याज देण्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असून तो अंतिम आदेश आहे त्यामुळे साखर आयुक्तांनी याबाबत वेळकाढूपणा न करता विलंब व्याज न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा तो न्यायालयाचा अवमान होईल अशी लेखी मागणी याचिकाकर्ते प्रल्हाद इंगोले यांनी आयुक्तांकडे केली .

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.