हिंगोली: चौकशी मागणीसाठी एकाचा अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच घडला प्रकार; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

0

हिंगोली, रयतसाक्षी : भारतीय मानव अधिकार संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष मिलिंद प्रधान यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आज दिनांक 26 जानेवारी रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला.

पदाचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवून तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी रजिस्टर सेनगाव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी मिलिंद प्रधान यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील खरेदी कार्यालयात तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन केले जात असून, पैशा पोटी सबरजिस्टर मौजे तळणी येथील दस्त क्रमांक २४/२२व २५/२२ व २३/२२ दी.०३/०१/२०२२ तुकडे बंदी कायद्याचे भंग होणारे तीन दस्त हे मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाण-घेवाण करून कोणतीही चौकशी न करता दस्त केले आहेत.

यासह विविध प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. चौकशी न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आज मिलिंद प्रधान यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली होती. यावेळी कर्तव्यावर हजर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.