थोर विचारवंत डाॅ बाबासाहेब आंबेडकर

0

 

भारताच्या कीर्तीवंत सुपुत्रामध्ये बाबासाहेब यांचे नाव आग्रस्थानी आहे.देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितीजावर त्यांचा उदय१९२०च्या दशकात झाला.समाजात त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले गेले.आयुष्यभर त्यांनी सामाजीक व्यवस्थेशी संघर्ष केला.बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारवंत होते. न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीतज्ञ, तत्वज्ञ, पत्रकार, भारतीय संविधानाचे शिल्पकार ,मानवी हक्कांचे कैवारी आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.

त्यांनी दलित, बौध्द चळवळीला प्रेरणा दिली. समाजातील सामाजिक भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. कारण ते स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. स्त्रियांचे उध्दारक भारतात पुष्कळ झाले. परंतु कैवारी मात्र एकच झाला ते म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. “स्त्रियांच्या प्रगती व मुक्तीसाठी संघर्ष करणारा ते एक यौध्दा होत” ते ख-या आर्थाने योग्यच आहे. त्यांच्यावर तथागत गौतम बुध्दांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. बाबासाहेबांच्या मते तथागत गौतम बुध्द हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्तै होत.

बुध्द धर्मात स्त्रीया अहर्त पदाला पोहचल्या म्हणून तथागताने स्त्रियांना धम्माची दीक्षा दिली. त्यांना संघात स्थान दिले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्या आयुष्यात स्त्रीयांचा सदैव सन्मान केला, त्यांना माणूसपण बहाल केले. बाबा साहेबांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजाच्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरुन करता येते.

समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यक्ता आहे. असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत. स्त्रियांवर होणा-या अत्याचारामूळे ते अस्वस्थ होत, स्त्रियांची मूक्ती करायची असेल तर स्त्री शिक्षणहे त्यावर रामबाण उपाय आहे. शिक्षण हे प्रभावी शस्त्र आहे. आपल्या लेखातून, व्याख्यानातून पोटतिडकीने याची दखल घेत

समाजातील सर्व स्त्रीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांनी अथक प्रयत्न केले. त्यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले, राजाराम मोहनराॅय, महर्षी कर्वै, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून व विचारातून स्त्रियांना न्याय आणि समानता देण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना बंधनमुक्त आयुष्य जगता यावे म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेतून स्त्रीयांच्या वाट्याला आलेले दुय्यम स्थान ओळखून स्त्री-पुरुष विषमतेवर प्रचंड आघात करत तिच्या हक्कांचा पुरस्कार केला.

आपल्या संस्कृतीचा विचार करता भारतीय परंपरेने स्त्रीला कायम गुलाम म्हणून वागवले. अतिप्राचीन काळात भारतात मातृसत्ताक पध्दती अस्तित्वात होती. धर्म, आध्यात्म, आणि तत्वमीमांसेच्या सर्वात कठीण विषयावर स्त्रीयांची पकड होती. पण, नंतरच्या काळात तिच्यावर असंख्य बंधने लादली. तिला कायम जोखडात ठेवले गेले. तिला बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतींच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या अधिपत्याखाली राहावे अशी व्यवस्था मनूस्मृतीने करुन ठेवली होती तिचे सर्व हक्क नाकारुन तिला फक्त भोगदासी बनवले, चूल आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र मनूस्मृतीने करुन ठेवले होते.

बासाहेबांना हे मूळीच मान्य नव्हते म्हणून बाबासाहेबांनी “मनूस्मृतीचे” दहन करत भारतीय स्त्रीयांवर असंख्य उपकार केले, ते समस्त स्त्रीवर्ग कधीच विसरु शकणार नाही. डाॅ.बाबासाहेब यांना आपण ओळखतो ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आणि दलितांचे कैवारी म्हणून पण, त्याचे कर्तृत्व इतपतच मर्यादित नाही.ते खूप व्यापक आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे कुटूंबवत्सल होते. ते आपल्या पत्नीला रमाबाईंना “रामू ” म्हणून हाक मारत. त्यांनी रमामाईला लिहायला वाचायला शिकवले. त्यामूळे बाबासाहेबांच्या सोबत समाजजागृतीसाठी त्या सुध्दा महिलांच्या सभांचे आयोजन करीत असत.

त्यांच्या समोर भाषणे देउन दलित चळवळीत सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रेरीत करत. स्त्री स्वातंत्र्याची संकल्पना बाबासाहेबांनी प्रथम आपल्या घरात रुजवली. डाॅ.बाबासाहेब यांच्या कठीण काळात रमाबाई ह्या त्यांच्या माघे अतिशय खंबीरपणे उभ्या होऊन त्यांची सावली झाल्या. स्त्री जशी गृहिणी तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही आहे, असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत. रमामाईच्या शोषित वृत्तीमूळेच बाबासाहेब घडू शकले. एखाद्या यशस्वी पुरुषामाघे स्त्रीचा हातभार असतो तसे रमामाई आंबेडकरांच्या प्रेरणास्त्रोत झाल्या.

भारतीय स्त्री जीवनात क्रांतीकारी बदल घडवू पाहाणा-या हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची महती शब्दात व्यक्त करता येणार नाही. कारण त्यांचे कार्य युगप्रवर्तक आणि ऐतिहासिक आहे. भारतीय स्त्रीयांच्या हातापायात जखडलेल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणारी ती नव्या इतिहासाची नांदी होती. याची दखल मात्र समाजातील काही उच्चप्रभू स्त्रियांनी घेतली नाही ही मोठी शोकांतीका आहे. कारण, बाबासाहेबांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यांना बंधनमूक्त केले.

बाबासाहेब स्त्रीयांना उद्देशून नेहमी म्हणत “स्त्रीयांनी मुलांना शिक्षण देण्याचा आग्रह धरावा, ज्ञान आणि विद्या ही काही पुरुषांची मक्तेदारी नाही. तर स्त्रियांचा देखील तो हक्क आहे. गरीब स्त्रियांनी नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ राहावे असे ते म्हणत.स्त्रीपुरुष विषमतेवर आणि जातीजातीमधील विषमतेवर आधारित समाजव्यस्था नाकारत बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी “मनुस्मृती” चे दहन केले, देवदासी, मुरळी, जोगतीण यांच्याबाबत असलेल्या प्रथा उखडून टाकण्याची चळवळ बाबासाहेबांनी चालवली.

सन १९२७ च्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात स्त्रीयांचा सहभाग होता. तसेच १९३० च्या काळाराम मंदिर सत्याग्रहात पहिली अटक होणारी तुकडी विशेष म्हणजे स्त्रीयांचीच होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी ह्या समाजातील महिलांच्या नेतृत्वाचा पाया भक्कम करण्यासाठीच होता, आज भारताला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरी आंबेडकरांच्या स्वप्नातील सामाजीक न्याय अजून खूपच दूर आहे, कारण आजही स्त्रीयांना शनि शिंगणापूरच्या आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात अजूनही प्रवेश नाही. ही स्वतंत्र भारताची सर्वांत मोठी खंत आहे.

समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करावे असे त्यांना वाटत. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्तै होते. औरंगाबाद येथे मिंलिंद महाविद्यालयाची स्थापना केली तेव्हा त्यांनी मुलींनाही प्रवेश दिला. तसेच कामगार किंवा नौकरी करणा-या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत.
आपल्या भारतानंतर अनेक वर्षानंतर इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत. खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणा-या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजूरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, यासारखे अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्यांनी स्त्रीयांना त्यांचे हक्क बहाल केले. बाबासाहेब १९४७ मध्ये जेव्हा कायदे मंत्री होते तेव्हा त्यांनी हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला.

या मध्ये स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नासंबंधातील स्त्री-पुरुष समानता. या तत्वांचा यात समावेश होता. सर्व क्षेत्रामध्ये दलित, भटके विमुक्त, इतर मागास, अल्पसंख्यांक, महिला यांना प्रतिनिधित्व मिळाव यासाठी त्यांनी आग्रह धरला. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला. तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी दिला.

बाबासाहेब म्हणत स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वत:ही समोर यायला हव, अन्यायाचा प्रतिकार करायला हवा.भारतातील सर्व स्त्रियांच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, घटस्फोटासाठी ई. बाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडले आणि प्रतिगामी विचारांच्या हिंदू सभासदांनी त्याला विरोध केल्यामूळे ते नामंजूर झाले. म्हणून त्यांनी महिलांच्या हक्कासाठी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला. सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळवणे त्यांना महत्वाचे वाटत होते. त्यांनी सत्तेसाठी तत्व सोडले नाही, तर तत्वासाठी सत्तात्याग केला.

स्वता:च्या तत्वासाठी पदाचा राजीनामा देण्याचा तत्वनिष्ठपणा दाखवणा-या अत्यंत दुर्मिळ लोकात बाबासाहेबांचा समावेश होतो. त्याचबरोबर स्त्रियांना आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करुन दिली. मानसिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त केले. त्यांनी प्रज्ञा, करुणा यावर आधारलेले आपले तत्वज्ञान मांडतांना स्त्री शक्तीला गृहित धरले.

त्यांच्यातील स्वसामर्थ्याची जाणीव करुण दिली व दास्यमुक्तीच्या लढ्यास प्रवृत्त केले. अशा या महामानवाचे महानकार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. आजची स्त्री सुशिक्षित आहे, स्वतंत्र आहे. स्वत:च्या पायावर ऊभी याचे सारे श्रेय फुले दांपत्यांना जाते तसेच आजची स्त्री स्वत:च्या हक्काबाबत सजग आहे, जागरूक आहे, स्वत:च्या हक्कासाठी ती पेटून उठते या सा-या गोष्टीचे श्रेय डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना जाते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या गाभा-यात स्त्री पुरुषस समानतेला स्थान दिले, इतकेच नाही तर त्यासाठी आंदोलने देखिल केले.

हिंदू कोड बिल हा देशातील विधानमंडळाव्दारे घेतलेला सर्वांत मोठा सामाजिक सुधारणेचा निर्णय आहे. हा असा कायदा आहे जो आधीही कधी झाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात देखिल येणा-या कुठल्याही कायद्याशी त्याची तूलना होणे शक्य नाही. वर्गावर्गात असलेली विषमता आणि वर्गा अंतर्गत सुध्दा स्त्री पुरुष असा असणारा लिंगभेद हाच हिंदू समाजाचा आत्मा आहे.

हा भेद ही विषमता मिटविल्याशिवाय आर्थिक सुधारणेबाबत कायदे करणे म्हणजे शेणाच्या ढिगा-यावर भारतीय संविधानाचा अवाढव्य महाल बांधण्याचा खोटा दिखावा करण्याइतपत दांभिक प्रकार आहे असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. हिंदू कोडबिलाच्या व्दारे बाबासाहेबांनी महिलांना गुलामगिरीतून, जाचक रुढी-प्रथा, परंपरेपासून मूक्तता मिळवून दिली.

त्यामूळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया आपला ठसा उमटवत यशाचे शिखर पार करत आहेत. याचे सारे श्रेय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते.म्हणूनच २१ व्या शतकात आपल्या देशाला विकासाच्या दिशेने जावयाचे असेल तर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. जनमाणसात आत्मसन्माची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वान झाले. त्या निम्मित त्यांच्या पावन स्मृतिस त्रिवार अभिवादन…!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.