..तर भाजपला सर्वप्रथम राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा लागेल- संजय राऊत

भाजपचा टिपू सुलतानला विरोध ; स्वत: राष्ट्रपती कोविंद यांनी टिपू सुलतानचे कौतुक केल्याची राऊत यांची प्रतिक्रिया

0

रयतसाक्षी: मुंबईतील मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात आले आहे. त्यावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. राज्यात विरोधात बसलेले भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा टिपू सुलतानाच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. अशी मागणी आता संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबईतील मालाडमधील क्रीडा संकुलाचे उद्घाटन पालकमंत्री असलम शेख यांनी केले आहे. त्यावर राज्यात टिपू सुलतानाच्या नावाला विरोध होत होत आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाव हटवण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास भाजप राज्यभर आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर राऊत यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज सकाळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, भाजपचा टिपू सुलतानाच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलतानाचा गौरव केला होता. टिपू सुलतान हा महान योद्धा आणि प्रशासक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यायला तयार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, टिपू सुलतानच्या नावावर भाजप राजकारण करत असून, टिपू सुलतानचे काय करायचे हे, राज्य सरकार आणि महापालिका बघून घेईल. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. हे लक्षात ठेवा. श्रीरंग पट्टणम, हैदरअली यांच्याविषयी आम्हालाही माहिती आहे. कोणी काय अत्याचार केलेत, हेदेखील आम्ही जाणतो. पण भाजप सगळा जुना इतिहास पुसून नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आपण ते पाहतच आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तुमच्यात हिंमत असेल तर दंगली करुनच दाखवा
मालाडमधील क्रीडा संकुलावरुन राजकारण तापले असून, प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. टिपू सुलतान नावाचा निर्णय मागे घ्या अन्यथा महाराष्ट्र पेटवू असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. त्यावर देखील राऊत यांनी भाष्य केले. राऊत म्हणाले की, राज्यभरात आंदोलन पेटवू, ही भाषा कोण करत आहे, ते आम्हाला माहिती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात दंगली करुनच दाखवा, याठिकाणी ठाकरे सरकार आहे, हे लक्षात ठेवा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.