सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय बदलला तरी वाईट वाटण्याचे कारण नाही – शरद पवार

राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नाही, मात्र निर्णय बदलला तरी फारसं वावगं होणार नाही असे पवार म्हणाले

0

मुंबई, रयतसाक्षी: गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर त्यांचा विविध स्तरांकडून विरोध केला जात आहे. विरोधीपक्षाने यावरुन टीकेची झोड उठवली आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नाही, मात्र निर्णय बदलला तरी फारसं वावगं होणार नाही असे पवार म्हणाले आहेत.

वाईन विक्रीच्या विषयावर पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की,’राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध केला जात असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही. यामध्ये काही वावगं ठरणार नाही. असे शरद पवार म्हणाले आहेत.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारुची विक्री होते. त्यामध्ये वाईनचा खप तुलनेने खूप कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये होते. या जिल्ह्यामध्ये 18 वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याविषयी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर राज्य सरकारने निर्णय बदलला तरी वाईट वाटण्याचे कारण नाही. खरेतर वाईन आणि इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. ती घेतली नाही आणि याला विरोध असेल तर सरकारने या सर्व गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध नाही.’

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.