हिंगोलीत सातव समर्थक विलास गोरे पक्षातून निलंबीत

या कारवाईमुळे स्वपक्षीयांकडूनच सातव गटाचे पंख छाटल्याचे बोलले जात आहे.

0

हिंगोली, रयतसाक्षी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांना सातच गटाचे विलास गोरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. मागील दहा दिवसापूर्वी जिल्हास्तरीय कार्यक्रमात घडलेल्या प्रकाराचा ठपका ठेऊन विलास गोरे यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले यांनी निलंबीत केले आहे. दरम्यान या कारवाईमुळे स्वपक्षीयांकडूनच सातव गटाचे पंख छाटल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख हे मागील दहा दिवसापूर्वी हिंगोलीत आले होते. दरम्यान बैठक सुरू असताना सातव समर्थक आणि भाऊ पाटील समर्थक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.  त्यातूनच ही कारवाई झाल्याने पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

 

विलास गोरेकडे पक्षाची प्रभावी जबाबदारी नसली तरी ते अनेक वर्षांपासून सातव घराण्याचे समर्थक राहिले आहेत. दिवंगत खासदार राजीव सातव यांचे ते कट्टर समर्थक होते. खासदार सातव यांच्या निधनानंतर ते काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या सोबत सक्रीय झाले.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख आणि विलास गोरे याच्यात अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर भाऊ पाटील समर्थक व सातव समर्थक या दोन गटात पक्षकार्यालय परिसरात राडा झाला. जिल्हा प्रभारी देशमुख हे माजी आमदार भाऊ पाटील यांच्या निवासस्थानी का गेले या मुद्द्यावरून हा वाद झाला होता. तर माजी आमदार भाऊ पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना म्हटले होते, की त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेक वर्षांपासून हेतुपुरस्सर डावलण्यात येत आहे. पक्षांचे इमानदार कार्यकर्ते असताना आमच्यावर अन्याय होतो अशी तक्रार त्यांनी केली होती.

दरम्यान या  वादावादीनंतर पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनाच लक्ष्य करून त्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. या घटनाक्रमात पक्षाचे कार्यकर्ते विलास गोरे यांनी बाळासाहेब देशमुख यांना अश्लील शिवीगाळ केली असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे. या बाबीची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार विलास गोरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबत संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांना दि.१२ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्र पाठवले असून या पत्रानुसार विलास गोरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.