महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपीस अटक

चाकुचा धाक दाखवून चोरले दागिने , अवघ्या १२ तासांत अटक हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा व नरसी पोलिसांची संयुक्त कारवाई

0

हिंगोली, रयतसाक्षी : तालुक्यातील पहेणी येथील सिंधू बालाजी घोंगडे या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने लंपास करणाऱ्या आरोपीस हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा व नरसी ना. पोलिसांच्या पथकाने अवघ्या बारा तासात अटक केली. अशी माहिती सोमवारी (दि.१४) फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.

पाणी पिण्याच्या बहाण्याने चोरट्याने पहेणी येथील एका घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत सिंधू घोंगडे यांच्या अंगावरील सोने व चांदीचे दागिने काढून घेतले होते. याप्रकरणी नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना सूचना दिल्या.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे तसेच नरसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल लांडगे यांनी तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तसेच गुप्त बातमीदारमार्फत आरोपीचा शोध घेतला. यावेळी जबरी चोरी करणारा आरोपी नागोराव सुखदेव श्रीरामे रा. हनकदरी ता. सेनगाव यास आडोळ येथील यात्रेमधून अटक केली. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने पहेणी येथील गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी कारवाई करून आरोपीकडील सोन्याचे दागिने मोटरसायकल, मोबाईल तसेच एक धारदार शस्त्र असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार
आरोपी नागोराव श्रीरामे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाणे तसेच औंढा नागनाथ आणि आळेफाटा पुणे ग्रामीण ठाणे या ठिकाणी दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.


पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिष देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, शेख शकील, राजू ठाकुर, शेख जावेद, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर पायघन, किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे, सपोनि अनिल लांडगे, अंमलदार गुठे, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.