महाआघाडीवर ईडीचे धाडसत्र : देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक १३नेत्यांमागे ससेमिरा

राज्यात 11 महिन्यांत राष्ट्रवादीच्या 7, तर शिवसेनेच्या 5 नेते वा निकटवर्तीयांवर ईडीचा बडगा

0

रयतसाक्षी: आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीतर्फे गेल्या वर्षभरात देशभरातील राजकीय नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मार्च २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील अकरा महिन्यांमध्ये ईडीकडून राज्यातील १३ नेत्यांविरोधात वा त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात समन्स, चौकशा, मालमत्तांची जप्ती आणि अटकेचा बडगा उगारण्यात आला आहे. ईडीने वर्षभरात देशातील २८ राजकीय नेत्यांविरोधात कारवाई केली. त्यापैकी १३ नेते एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७, तर शिवसेनेतील ५ नेते वा त्यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी ९ मार्च रोजी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांना पुणे सहकारी बँक घोटाळाप्रकरणी अटक केली. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात आहेत. त्यानंतर गेल्या ११ महिन्यात राज्यातील तब्बल १३ नेत्यांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री ईडीच्या कोठडीत गेल्याचे हे देशातील एकमेव उदाहरण आहे. त्याशिवाय दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांभोवती अटक, समन्स व चौकशांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडे मोर्चा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना तब्बल दोन वर्षांनंतर ईडीच्या कोठडीतून जामीन मिळाला होता. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचे छापे व चौकशीचे सत्र झाले होते.

नुकतेच शिवसेना आमदार यामिनी जाधव व त्यांचे पती मुंबई पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात ईडीकडे तक्रारी दाखल. बेनामी संपत्तीप्रकरणी आयकरचे नुकतेच धाडसत्र झाले.

पालिकेच्या ठेकेदाराकडून घेतलेले १५ कोटी शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागेही लवकरच ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

11 वर्षांत 1700 छापे, फक्त 9 मध्ये गुन्हे सिद्ध
सर्वोच्च न्यायालयात नुकतेच पीएमएलएशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना वरिष्ठ अधिवक्ता मेनका गुरुस्वामी यांनी सांगितले होते की, ईडीने २०११ ते आजवर एकूण १,७०० छापे मारले. तसेच १,५६९ प्रकरणांचा तपास केला. असे असूनही केवळ ९ प्रकरणांतच गुन्हे सिद्ध (कन्व्हिशन) करता आले.

महाआघाडीवर ईडीचे धाडसत्र

मार्च २१ ते फेब्रुवारी २२ कालावधीतील विश्लेषण, मंत्री प्राजक्त तनपुरे ‘लेटेस्ट’
महाविकास आघाडीला पकडले कोंडीत, दोन मंत्र्यांना पाठवले कोडठीत
९ मार्च २०२१ : राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले यांना पुणे सहकारी बँक घोटाळ्यात अटक, वर्षभरापासून जेलमध्ये.
१९ मे २०२१ : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना नव्याने समन्स बजावले.
१६ जून २०२१ : शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांना कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अटक, १८ ऑगस्ट २०२१ रोजी मालमत्ता केली जप्त.
१ जुलै २०२१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे निकटवर्तीय उद्योजक अविनाश भोसले यांना समन्स व २२ जूनला मालमत्ता जप्त.
८ जुलै २०२१ : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक, पत्नी मंदाकिनी खडसे यांना १७ ऑगस्ट रोजी बजावले समन्स.
३० ऑगस्ट २०२१ : सेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांना समन्स आणि चौकशी.
२ सप्टें. २०२१ : उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे जरंडेश्वर शुगर फॅक्टरीच्या चौकशीत नाव तसेच काही जागांवर केली छापेमारी.
२७ सप्टें. २०२१ : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी सिटीबँकप्रकरणी छापा.
२८ सप्टे. २०२१ : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना महिला उत्कर्ष
प्रतिष्ठान प्रकरणी अटक, १८ ऑक्टोबर रोजी गवळींना समन्स.
३ नोव्हें. २०२१ : राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक, ३ महिन्यांपासून सहायकांसह ईडी कोठडीत.
२ फेब्रु. २०२२ : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत या उद्योजकाला अटक. त्यांच्या पत्नी माधुरी यांच्यासोबतच्या व्यावसायिक भागीदारीसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना समन्स बजावले.
२३ फेब्रु. २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने केली अटक. मनी लाँड्रिंग आणि टेरर फायनान्सिंगसारखे गंभीर आरोप लावले.
२८ फेब्रु. २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंवर लिलावात काढलेला साखर कारखाना अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप. ७.६ कोटींच्या मालमत्तेवर टाच.
अन्य राज्यांत कारवाई
पश्चिम बंगाल – ६ :फरहाद हकीम, परिवहनमंत्री, तृणमूल काँग्रेस सुब्रता मुखर्जी, पंचायत मंत्री, तृणमूल काँग्रेस मदन मित्रा, माजी मंत्री, तृणमूल काँग्रेस सोवन चटर्जी, माजी महापौर, तृणमूलमधून भाजपात कुणाल घोष, माजी खासदार, तृणमूल काँग्रेस शताब्दी रॉय, खासदार, तृणमूल

बिहार, आंध्र प्रदेश, उ.प्र.प्रत्येकी २ : अमरेंद्र धारी, खासदार, आरजेडी जयप्रकाश मंडल, नेता, जेडीयू अनुमाला रेड्डी, खासदार तेलगू देसम संद्रा वेंकट, आमदार तेलगू देसम मोहंमद इक्बाल, माजी आमदार बसपा आझम खान, समाजवादी पक्ष

दिल्ली, पंजाब, तामिळनाडू – प्रत्येकी १ : कमलाकांत शर्मा, काँग्रेस भूपेंद्र सिंघ, अटक – मुख्यमंत्री चरणजित सिंग यांचे भाचे अनिथा राधाकृष्णन डीएमकेचे मंत्री यांना अटक
(स्रोत: सक्तवसुली संचालनालय, वेबसाईट ,नवी दिल्ली)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.