…तर भाजप अधिवेशन चालू देणार नाही -प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पडघम अधिवेशनाचे : नवाब मलीकांच्या राजीनाम्यावर ठाम

0

रयतसाक्षी: देशद्रोहासह इतर काही गंभीर गुन्हे असल्याने अटक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारपर्यंत घेतील अशी अपेक्षा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पक्ष विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिला.

मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीने मलिक यांना पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. येत्या ३ मार्चपासून मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आक्रमक भूमिकेसह त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे द्योतक आहे.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिने तीनशे कोटींची मालमत्ता बळकावली व ती तांत्रिकदृष्ट्या नवाब मलिक यांच्या कंपनीच्या मालकीची असल्याचे दाखवले. दाऊदसाठी मनी लाँड्रिंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून अधिक तपासासाठी मलिक यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रिमोट कंट्रोलने महाविकास आघाडी सरकार चालवणारे शरद पवार हे तातडीने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मलिक यांच्या राजीनाम्यास नकार देऊन मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले हे धक्कादायक आहे, असे पाटील म्हणाले.

प्रखर भूमिका घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाकडून गुन्हेगारांची पाठराखण धक्कादायक १९९२ची मुंबईतील दंगल व १९९३ बॉम्बस्फोटाच्या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी प्रखर भूमिका घेतली होती. आज त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री असताना मात्र त्या बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांना साथ देणाऱ्या मंत्र्याची पाठराखण करतात हे धक्कादायक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.