धाकट्या अलंकापुरीत शिवसाप्ताहाची सांगता

राजकिय मातब्बरांची हाजेरी, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: महाशिवरात्रीच्या पर्वनीस शिरूर कासार शहरातील श्री. सिद्धेश्वर संस्थान , धाकटी अलंकापुरी येथे मठाधिपती स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या सात दिवसीय शिवसाप्ताहाची बुधवारी दि. २ सांगता झाली. परिसरातील हजारो भाविकांसह राजकिय मातब्बरांनी किर्तन श्रवणासह महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

महाशिवरात्री पर्वास वै. ह.भ.प. आबादेव महाराज यांनी शहरातील धाकटी अलंकापुरी येथे शिवसाप्ताहास प्रारंभ केला. गेल्या ४४ वर्षापासून अखंडीत सुरू असलेल्या शिवसाप्ताहास याही वर्षी मठाधिपती स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या आयोजनाने सुरवात झाली होती. कोरोना संकटामुळे मागील वर्षी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत साप्ताहाची सांगता करण्यात आली होती.

 

गेल्या दोन वर्षापासून शिवसाप्ताहाच्या पर्वनिला मुकलेल्या परिसरातील हजारो भाविकांनी यंदा मोठ्या उत्साहात साप्ताहामध्ये सहभागी होत श्रद्धेबरोबर भक्तीच्या वाटा मोकळ्या केल्या. मठाधिपती स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील ख्यातनाम प्रवचनकार, किर्तनकार, प्रबोधनकारांनी शिवसाप्ताहामध्ये सेवा बजावली. साप्ताहासाठी परिसरातील नागरिक दात्यांनी मोठ्या उदात्त हेतूने भरभरून दान दिल्याने साप्ताहामध्ये भक्ती, तृप्तीचा संगम भाविकांनी अनुभवला.

बुधवारी दि. २ सकाळी मठाधिपती विवेकानंद शास्त्री यांचे काल्याचे किर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हजारो भाविकांनी किर्तन श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी जिल्ह्यातील मातब्बरांनी उपस्थित राहून महाप्रसादाच्या रूपाने भक्ती- तृप्तीच्या सोमरसाचा लाभ घेतला. जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, माजी आमदार भिमसेन धोंडे, युवा नेते जयदत्त धस,  युवा नेते महेश आजबे आदी उपस्थितांचा मठाधिपती स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांनी सन्मान केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.