छगन भुजबळांची फडणवीसांवर शेलकी टिका

फडणवीस साहेब तुमचा वाचवा शब्द होता बुडवा होईल

0

रयतसाक्षी : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा ओबीसी आरक्षणाबाबतचा अहवाल फेटाळल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला धारेवर धरल्यानंतर अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आज अधिवेशन सुरू झाल्यानंतर भाजप महिला आमदाराने भुजबळ यांना ‘ओबीसी वाचवा’ हि टोपी दिली. या टोपीचा संदर्भ देत भुजबळ यांनी ‘ओबीसी आरक्षणावर तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे. तो ‘बुडवा’ होईल, असं काही करू नका’, अशा शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले.

 

ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका करत अधिवेशनात इतर सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानंतर बोलण्यास उभे राहिलेले छगन भुजबळ म्हणाले की, ‘फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टात काय झालं, त्यावर आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो. म्हणून भाजपच्या एका भगिनीनं ओबीसी वाचवा टोपी घालून दिली, मी ती लगेचच घातली. भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि हा विषय सोडवू. तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, असं मला वाटत नाही. कोण कुठं काय काय बोललं, हे सगळं माझ्याकडे आहे. पण, आपण आता शांतपणे बसून यावर मार्ग काढला पाहिजे. तुमचा ‘वाचवा’ हा शब्द आहे. तो ‘बुडवा’ हा शब्द होईल, असं करू नका’

तांत्रिक गोष्टी राहून गेल्या!
ओबीसी आरक्षणावर तोडगा न निघाल्याने राज्यातील काही महापालिका, नगरपालिका यांची मुदत संपली हे मान्य; मात्र एकाही जिल्हा परिषदेची मुदत अद्याप संपलेली नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. तसेच, ओबीसी आरक्षणाची पुर्तता करण्यासाठी काही तांत्रिक गोष्टी राहून गेल्या. त्या मी मान्य करतो. सु्प्रीम कोर्टाचा आदर करतो. मात्र, आता एकत्र मिळून मार्ग काढूया. आम्ही सभागृहात एकमेकांवर चिखलफेक करणार नाही, उणीदुणी करणार नाही. आपण ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत, हे देशाला दाखवून देऊ, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.