आंदोलनकर्ते माजी सैनिक चढले झाडावर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाची तारांबळ, चार तासानंतर आंदोलनकर्ते उतरले खाली

0

बीड, रयतसाक्षी : बीड तालुक्यातील मोची पिंपळगाव येथील उत्खनन प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिक गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत शुक्रवारी सकाळी उपोषणकर्ते माजी सैनिक झाडावर चढल्याने एकच गोंधळ उडाला. तब्बल चार तासानंतर प्रशासनाच्या विनंतीवरून ते खाली उतरले.

 

तालुक्यातील मोची पिंपळगाव येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी येथील माजी सैनिक प्रल्हाद वाघमारे हे मागील पाच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. प्रशासन मात्र आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरो त्यांनी केला. त्यामुळे शुक्रवारी दि.४ संतापलेले माजी सैनिक सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील झाडावर चढले.

 

मागणीसाठी आंदोलनकर्ते चक्क झाडावर चढल्याचे पाहून एकच खळबळ उडाली. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या माजी सैनिकाला झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. तुम्ही अगोदर निवेदन टाईप करा, तरच खाली उतरतो अशी भूमिका आंदोलनकर्ते माजी सैनिक वाघमारे यांनी घेतली. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने निवेदन टाईप केल्या नंतर तब्बल चार तासानंतर ते झाडावरून खाली उतरले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.