इंग्रजी शाळांमधून चार हजारांवर विद्यार्थी झेडपीच्या शाळेत

नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारतोय, इंग्रजी शाळांच्या धर्तीवर ऑनलाईन शिक्षण

0

नांदेड, रयतसाक्षी: कोविड काळात विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग राबवून जिल्हा परिषदेने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये वळविले आहेत. जिल्ह्यात 4,111 विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक गुणवत्तापूर्ण होतील यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या बैठका घेऊन अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग सुरू केले आहेत. अलीकडे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमातून शिकलं पाहिजे असे वाटू लागल्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली होती. परंतु पुरेशा शिक्षित मनुष्यबळाचा अभाव आणि इतर शैक्षणिक साधन सुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थी रमेनासे झाले .
कोविडच्या काळात अनेक इंग्रजी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या तंत्रस्नेही शिक्षकांनी गृहभेटी, ग्रह अभ्यास ,व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षण, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्यामुळे इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आले आहेत .
हदगाव ,मुखेड आणि लोहा तालुक्यामध्ये जास्त प्रमाणावर विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेशित झाले आहेेेेेेत.

 

तालुकानिहाय प्रदेशी विद्यार्थी
हदगाव 1041, मुखेड 525, लोहा 464,कंधार 341, मुदखेड 111, नायगाव 354 ,उमरी 288 ,भोकर 177, धर्माबाद 116 ,बिलोली 61, देगलूर 60,अर्धापूर 98, नांदेड 43, हिमायतनगर 325, किनवट 246, माहूर 299 असा मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.