दारुसाठी दोघांनी केला मित्राचा खून

पोलीस कोठडीनंतर आरोपीची कबुली; भीतीपोटी एकाने केली आत्महत्या

0

माजलगाव, रयतसाक्षी : तालुक्यातील गडदेवाडी (ता.आंबेजोगाई) येथे बाबुराव र विठ्ठल गडदे (वय ४५, रा.चिचखंडी, ता.अंबाजोगाई) यांचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना १० मार्च उघडकीस आली होती. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना यश आले असून संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत खुनाची कबुली दिली आहे. तर मित्राची हत्या करणाऱ्या अन्य एका आरोपीने कारवाईच्या भितीपोटी दारुच्या कारणातून गळफास घेवून आत्महत्या केल्याचेही समोर आले.

 

बाबुराव विठ्ठल गडदे हे ९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घरातून निघून गेल्यानंतर परतले नसल्याची तक्रार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर १० मार्च रोजी दुपारी बाबुराव गडदे यांचा मृतदेह गडदेवाडी शिवारात ओढ्याच्या पात्रात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला.

सदरील खून गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले. अहवाल येताच पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून वेगाने तपास सुरु केला. तपासाअंती आरोपी रामचंद्र गडदे आणि महादेव गडदे या दोघांनी हा खून केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले. पोलिसांनी तीन पथके तैनात करून त्या दोघांचा शोध सुरु केला. त्यातील एक पथक गडदेवाडी गावातच ठाण मांडून होते. इतर दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीच्या शोधात होते.

 

दरम्यान, यातील एक आरोपी महादेव गडदे याने दि. १२ मार्च रोजी पोलिसी कारवाईच्या भीतीपोटी गडदेवाडी येथे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरा आरोपी रामचंद्र गडदे हा ऊसतोडीसाठी म्हणून फरार होता. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपर अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे, उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोलीस कर्मचारी गुट्टे, बाळकृष्ण मुंडे, कल्याण देशमाने यांनी पूर्ण केला.

 

दारू देण्यास नकार दिल्याने केला खून:

सुरुवातीस आढेवेढे घेणाऱ्या रामचंद्र गडदे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. बाबुराव गडदे, महादेव गडदे आणि रामचंद्र गडदे हे तिघे मित्र ९ मार्च रोजी दारू पिण्यास बसले. यावेळी सुरुवातीला त्यांनी महादेव गडदे याच्या जवळील दारू न पिली. त्यानंतर महादेव आणि रामचंद्र हे बाबुरावला त्याच्या जवळील दारू पिण्यासाठी बाहेर काढ म्हणून मागे लागले, परंतु त्यासाठी बाबुराव टाळाटाळ करत होता. त्यामुळे चिडून त्या दोघांनी बाबूरावच्याच गळ्यात असलेल्या गमज्याने त्याचा गळा आवळला. त्यानंतर बाबुरावला ओढ्यात टाकून डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतला असे रामचंद्रने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

आरोपी न्यायालयीन कोठडीत:

दरम्यान, पोलिसांनी रामचंद्र गडदे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १२ मार्च ते १८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दि. १९ मार्च रोजी त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.