मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मेहूण्याविरूद्ध् इडीची कारवाई

श्रीधर पाटणकर यांची ६.४५ कोटींची मालमत्ता जप्त, ठाण्यातील ११ फ्लॅट्सही जप्त

0

रयतसाक्षी : केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मंगळवारी दुपारनंतर कारवाई केली आहे. दिवसभरातील ही मोठी कारवाई असून, ईडीने त्यांची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले असून श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याबाबत माहिती दिली आहे. हे ट्विट त्यांनी संपुर्ण इंग्रजीमध्ये केले मात्र, त्यांनी साला हा शब्द जाणीवपुर्वक लिहिलेला दिसतो. घोटाळेबाजोको छोडेंगे नही असा इशारा त्यांनी ट्विटमधून दिला.

तुम्ही आम्हाला जास्त डिवचाल तेवढे जवळ येऊ- जितेंद्र आव्हाड
सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून, राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. तुम्ही आम्हाला जास्त डिवचाल तेवढे जवळ येऊ. महाराष्ट्राच्या जनतेला हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसते आहे. जनतेला खरं काय खोटं काय हे सगळे कळते. अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग- नाना पटोले
केंद्रातील भाजप सरकार हताष होऊन तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्राकडून वारंवार प्रयत्न सुरू आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. असे नाना पटोले म्हणाले. भाजप सुडाचे राजकारण करत असून, भाजपच्या धमक्यांना महाविकास आघाडी घाबरणार नाही. भाजपला हे खूप महागात पडेल. असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

पटोलेंना सिरियस घेण्याची आवश्यकता नाही
श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया नेण्यास सुरुवात झाली आहे. नाना पटोले यांनी भाजपला हे महागात पडेल असे म्हटले होते. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, नाना पटोले यांना त्यांच्या पक्षातील नेते देखील सिरियस घेत नाही. असे म्हणत शेलार यांनी नाना पटोले यांची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नितेश राणे
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली असून, मुख्यमंत्र्यांनी घरात लपून बसण्यापेक्षा आपला राजीनामा द्यावा. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

… काहीही फरक पडणार नाही
या कारवायांनी काहीही फरक पडणार नाही, तुम्ही जितकं त्रास द्याल तितकच महाविकास आघाडी ताकतवान बनेल. असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
श्रीधर पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमीटेडचे मालक आहेत. ईडीने आज ११ सदनिका जप्त केल्या आहे. पाटणकरांच्या कंपनीला ३० कोटींचे विनातारण कर्ज हमसफर डिलर कपंनीने दिले होते. हे ३० कोटी रुपये नंदकिशोर चतुर्वेदींच्या बनावट कंपनीमधून आल्याचा ईडीचा आरोप आहे. नंदकिशोर आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत टाकण्यात आले. नंदकिशोर आणि महेश पटेल यांच्या मनी लाँड्रिंगचा ईडीचा आरोप आहे.

 

बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे

आज सकाळच्या सत्रात तपास यंत्रणांनी महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे घातले. विशेष म्हणजे ईडीच्या पथकाने मुंबईतील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील घरावर छापा टाकला. छाप्यात मुंबईतील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपचाही समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी 8 ते 9 च्या सुमारास कुर्ल्यातील गौवाला कंपाऊंडमध्ये पोहोचले आणि नवाब मलिक यांच्या घरी छापा घालून कुटुंबीयांकडून कागदपत्रे मिळवत तपास सुरू केला. या टीममध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआरपीएफची मोठी तुकडीही त्यांच्यासोबत आहे.

याच गोवा कंपाउंडजवळील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकला अटक केली होती. या जमिनीशी संबंधित व्यवहारांची अधिक माहिती मिळविण्यासाठी ईडीच्या पथकाने हा छापा टाकला आहे. ईडीच्या हाती कोणते नवे पुरावे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आजच्या छाप्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत हे निश्चित.

मलिक यांना तुरुंगात खुर्ची, गादी आणि चटई

नवाब मलिक सध्या ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात आहे. दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सोमवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. नवाब मलिक यांना पाठदुखीची तक्रार असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना बेडवर झोपण्याची परवानगी दिली. त्यांना गाद्या, चटई आणि खुर्च्या वापरण्याची परवानगी आहे, परंतु सध्या त्यांना घरी बनवलेले अन्न खाण्याची परवानगी नाही. नवाब मलिकच्या वकिलानेही तुरुंगातील जेवणात मीठ जास्त असल्याने नवाब मलिक यांना घरी शिजवलेले अन्न खाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली नाही.

राज्यात 224 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यासह 23 ठिकाणी आयकर विभागाचे छापासत्र सुरू आहे. या छाप्यांमध्ये 224 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे छापे पाच राज्यांमध्ये 23 हून अधिक ठिकाणी पडले आहेत. महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यातील युनिकॉर्न स्टार्ट अप ग्रुप्सवर आयकर विभागाने छापे टाकले होते. यानंतर प्राप्तिकर विभागाने सुमारे 224 कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीचा शोध घेतला. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रविवारी (ता. 20 ) याबाबतची माहिती दिली. 9 मार्चला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील 23 ठिकाणी छापे टाकण्यात आले. रविवारी कर मंडळाने या संदर्भात नोटीस जारी केली तेव्हा ही बाब समोर आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.