कोविड निर्बंधांबाबत मोदी सरकारचे आदेश ..!

मास्क, सोशल डिस्टन्सिंगबाबत मोठा निर्णय

0

रयतसाक्षी : कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच देशभर ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला होता. त्या घटनेला कालच (ता. 22) दोन वर्षे पूर्ण झाली. त्याच वेळी मोदी सरकारने नागरिकांसाठी आज (ता. 23) मोठा निर्णय जाहीर केला. तो म्हणजे, देशभर दोन वर्षांपूर्वी लागू केलेले सगळे कोविड निर्बंध येत्या 31 मार्चपासून हटवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी डीएम (DM) कायदा लागू करणारा आदेश मागे घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्रे पाठवून डीएम कायद्यांतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे काढण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता कोविड निर्बंधमुक्त होणार आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास हे निर्बंध पुन्हा लागू करण्याचे अधिकार राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांना दिले आहेत. त्यामुळे कोविड निर्बंध मागे घेतले असले, तरी नागरिकांना कोविडबाबत दक्ष राहावे लागणार आहे.

केंद्राकडून आदेश जारी

सध्या जगभर कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका दिसत असताना, केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घातलेले सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज याबाबतचे आदेश जारी केले. त्यानुसार, येत्या 31 मार्चपासून देशात कोणतेही कोविड निर्बंध नसतील. आता फक्त दोन गोष्टी पाळाव्या लागतील, त्या म्हणजे, 6 फुटांचे सुरक्षित अंतर नि मास्क…!

तिसरी लाट ओसरली..

भारतात गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण बरेच कमी झालेय. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आता पूर्णपणे ओसरल्याचे सांगितले जाते. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1778 नवे रुग्ण आढळले, तर 62 जणांचा मृत्यू झाला.. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 12 हजार 749 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

येत्या जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचे ‘आयआयटी’ कानपूरच्या अभ्यासात सांगण्यात आले. पुढील तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. मात्र, मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने रुग्ण दवाखान्यात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी असेल, असे अभ्यासात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.