चार बॅनर कमी लागले तरी चालतील, सामान्यांची कामे अधिक करा- खा. ओमराजे निंबाळकर

प्रत्येक शिवसैनिकाने शिवसंपर्क अभियानाचा उद्देश लक्षात घ्यावा

0

माजलगाव,रयतसाक्षी: प्रत्येक शिवसैनिकाने शिवसंपर्क अभियानाचा उद्देश लक्षात घ्यावा. चार बॅनर कमी लागले तरी चालतील परंतु सामान्यांची कामे जर केली तर तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, सरकार बनवताना जे सूत्र ठरले ते बीड जिल्ह्यात राबवले जाते का? असा सवाल करत पक्षाने कार्यकर्त्याला बळ द्यायला हवे, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसेनेला ठोस निर्णय घ्यावे लागतील असे सूचक विधान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

 

बीड जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. मंगळवार दि. २२ रोजी माजलगाव येथे या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, अनिल जगताप, परमेश्वर सातपुते, रामराजे सोळंके, चंद्रकला बांगर, संदीप माने, बाळासाहेब कुरंद, अशोक आळणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, शिवसंपर्क अभियान माजलगाव येथून सुरू झाले आहे. तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आणि लगेच हे अभियान सुरु झाले आहे. लोकसभा अधिवेशन चालू असतानाही मराठवाडा आणि विदर्भात या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. सरकारची कामगिरी, निर्णय आणि जनहिताची कामे जनतेपर्यंत या माध्यमातून पोहोचायला हवी.

 

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी हे आरक्षण देण्याची पक्षाची भूमिका आहे. लोकशाहीत मालक कोणी नसतो निवडून आले म्हणजे सगळे झाले या अविर्भावात कोणी पण जाऊ नये. शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत जायला हव्यात शासन सत्तेवर येऊन दोन वर्ष  झाली आहेत मात्र दुर्दैवाने कोरोना महामारीमुळे नेतृत्वाची कसोटी सुरू झाली आहे असे असतानाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करून संपूर्ण राज्याला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे.

 

अनेक योजना आहेत, बीड जिल्ह्यात या योजना राबवताना सरकार म्हणून सर्वांना बरोबर घेण्याऐवजी घमेंडीपणाने त्या राबवल्या जात आहेत, अनेक प्रश्नांची सोडवणूक होणे बाकी आहे, वीज प्रश्न तातडीने सुटायला हवा. बीड जिल्ह्यात ऊसाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे सुरू असलेल्या साखर कारखान्यांना मे महिन्यापर्यंत चालू ठेवणे गरजेचे आहे.

 

सर्वसामान्यांची कामे करायची असतील तर पक्षाने बळ द्यायला हवे, महाविकास आघाडीचे जे सूत्र ठरले आहे ते बीड जिल्ह्यात राबवले जाते का ? असा सवाल करत शिवसेनेला ठोस निर्णय घ्यावे लागतील. हातात शस्त्र घेऊन लढ म्हणण्यापेक्षा शस्त्राला आधार देऊन लढण्याची ताकद पक्षाने द्यायला हवी. बीड जिल्ह्यात नारळ फोडण्याची स्पर्धा सुरू आहे येणार्या निवडणुका म्हणजे पक्षासाठी आरसा असेल असे ते म्हणाले.

 

यावेळी बोलताना उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर म्हणाले की, प्रत्येक शिवसैनिकाने शिवसंपर्क अभियानाचा उद्देश समजून घ्यायला हवा. शिवसेना म्हणून सर्वसामान्य जनतेची तुमच्याकडून कामाची अपेक्षा केली जात असते जिथे जिथे अन्याय किंवा चुकीचे काम केले जाते त्या ठिकाणी शिवसेना खंबीर पणे उभी असते, बॅनरबाजी करून नेता होता येत नाही सामान्यांची कामे जर केली तर मतदार तुम्हालाच स्वीकारतील.

 

लोकशाहीत मतदार हा राजा आहे हे लक्षात ठेवायला हवे. चार बॅनर कमी लागले तरी चालतील पण कामे आधी करा, आपलं कोणी बोलत नाही ते कधी गप्प बसत नाहीत. लबाड गोष्ट भाजपवाले शंभर वेळा लोकांना सांगतात त्यामुळे लबाडाची गोष्ट खरी वाटू लागते. आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा निर्णय केंद्राने मान्य केला असता तर आज मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, अनिल जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या अभियानाच्या कार्यक्रमास शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुकाप्रमुख, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.