उन्हाळ्यात माठांची एन्ट्री, कारागिरांच्या पोटाला गारवा..

0

माजलगाव, वेदांत गोपाळ : उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे थंड पाण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. परंतु. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची किंमत यावर्षी २० ते २५ टक्कयांनी वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. विजेशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यदायी थंड पाणी मिळत असल्याने सामान्यांचा माठ खरेदीकडे कल असतो. यावर्षी माती, मजूरी, भट्टी लावण्यासाठी लागणारे सरपण आदींच्या किमती वाढल्याने नाईलाजाने माठांच्या किंमती वाढविल्याचे कारागिर सांगत आहेत.

सध्या माजलगाव शहरात हा माठ बाजारात विक्रीसाठी जागोजागी दिसू लागला आहे. रांजण, नळ असलेला माठ, रांजणी, साधा माठ असे विविध प्रकारचे माठ सध्या विक्रीसाठी आले आहेत. शहर आणि परिसरातील विविध भागात रोड वरती हे माठ विक्रेते सध्या दिसत आहेत. वेगवेगळ्या आकार आणि प्रकारातील या माठांच्या किमतीत यंदा थोडी वाढ झाली असली तरी कारागिरांच्या पोटाला मात्र गारवा देताना दिसत आहे. उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज ठेवले जातात. फ्रीजसारखा थंडावा देणाऱ्या या माठांना यावर्षी चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

 

हे माठ बनविण्यासाठी काळ्या रंगाच्या मातीचा वापर केला जातो. पाणी जास्तीत जास्त थंड ठेवण्याचे या मातीचे वैशिष्ट्य आहे. या माठाच्या आकारानुसार १०० ते ५०० रुपये अशा त्यांच्या किमती आहेत.
ओमकार रमेश कुंभार, माठ विक्रेता

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.