गेवराईला पूर्ण वेळ तहसिलदारांची नियुक्ती करुन शेतकऱ्यांची कुचंबना थांबवा – मोरे

0

माजलगाव,वेदांत गोपाळ : महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक “तहसीलदाराची नियुक्ती करते. तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असही म्हणल जाते. पण गेवराई तालुक्याचा मात्र नक्की काय मामला झालाय हे प्रशासनच जाणो.

गेवराई तहसिल कार्यालय गेल्या अनेक दिवसापासून मामलेदाराविनाच कारभार हाकत आहे. याची ना जिल्हाधिकारी महोदयांना जाणीव आहे, ना महसुल मंत्र्यांना. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो. त्यावर त्याने योग्य निर्णय घेतल्यावरच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो. पण गेवराईमध्ये तहसिलदारच उपलब्ध नाही मग शेतकऱ्यांनी अर्ज करायचा कोणाकडे? गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई तहसीलचे तहसीलदार सचिन खाडे रजेवर असल्यामुळे तहसीलचा कारभार राम भरोसे असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांचे फळपिक अनुदान, शेतीचे फेरफार, विविध प्रमाणपत्रे, निराधार, आपंग, विधवा यांची कामे गेल्या अनेक दिवसांपासून तहसीलदार रजेवर असल्यामुळे प्रलंबित आहेत.

तहसीलदार यांनी तात्काळ तहसीलचा पदभार स्वीकारून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जमीन महसुलाशिवाय पिकांची आणेवारी काढणे ही महत्त्वाची जबाबदारी तहसीलदारावर असते.

या आणेवारीच्या आधारेच दुष्काळाची स्थिती जाणून घेऊन त्याची घोषणा केली जाते. यानंतर सरकारने नियमांनुसार निश्चित केलेली नुकसानभरपाई तहसीलदाराच शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतो. तालुक्यातून स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखणे ही कामेही तहसिलदारांचीच आहेत. तहसीलदार तालुका दंडाधिकारी म्हणून देखील काम करतो. कायद्याची पदवी न घेताही तो अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडतो. त्यात समन्स पाठवणे, प्रसंगी अटक वॉरण्ट काढणे, दंड करणे असे अधिकार येतात.

नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी आपल्या कार्याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करणे आणि तालुक्यात नैसर्गिक संकट आल्यास त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित सादर करणे, ही कामे तहसीलदारास करावी लागतात. पण गेवराईकरांचे दुर्दैव आहे की ईथल्या तहसिल कार्यालयाला तहसिलदारच उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कुचंबना तात्काळ थांबवावी अशी मागणी पुजा मोरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.