भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहिर

पंकजा मुंडेना पुन्हा डावलले, आमदार विनायक मेटेंचा पत्ता कट : प्रविन दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे यांना उमेदवारी

0

रयतसाक्षी : भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्राने या नावांना मंजुरी दिल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच, या सर्वांचे उमेदवारी अर्ज आजच दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पंकजा मुंडेना डावलले :

विधान परिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, चित्रा वाघ, सदाभाऊ खोत यांना पक्षाकडून संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, या तिन्ही नेत्यांना भाजपने संधी नाकारली आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वीच विधान परिषदेसाठी आपल्या नावाची चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून आपण विधान परिषदेसाठी इच्छूक असल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांना डावलत भाजपने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नवख्या उमेदवारांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

उद्या अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोराची रस्सीखेच लागली आहे. त्यात आता विधान परिषदेच्या १० जागांची भर पडली आहे. या दहा जागा विधानसभेतील सदस्यांकडून निवडून द्यावयाच्या आहेत. २० जून रोजी होत असलेल्या परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवार (९ जून) उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

 

राष्ट्रवादीकडून खडशे निश्चित

शिवसेनेकडून दोन जागांसाठी माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित आहे. दुसऱ्या जागेसाठी सभापती रामराजे निंबाळकर, अमरसिंह पंडित यांच्या नावावर विचार चालू आहे. काँग्रेसमधून भाई जगताप, नसीम खान, सचिन सावंत, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे यांची नावे दिल्लीला पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

आघाडीतील पक्षांना प्रतेयेकी दोन जागा

विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीच्या प्रत्येक पक्षाला २ जागा मिळतील. भाजपच्या ४ जागा सहज निवडून येतील. उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांचा कोटा आहे. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५३ तर काँग्रेसकडे ४४ मते आहेत. भाजपकडे १०६ चे संख्याबळ आहे. राज्यसभेला मदत केल्याच्या मोबदल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी विधान परिषदेसाठी काँग्रेसला मदत करणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्ष प्रत्येकी २ जागा लढवणार आहेत.

 

 

  • विधानपरिषदेचे वेळापत्रक
  • उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस : ९ जून २०२२
  • अर्जांची छाननी : १० जून २०२२
  • अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : १३ जून २०२२
  • मतदानाचा दिवस : २० जून २०२२
  • मतमोजणीचा दिवस : २० जून २०२२ (सायं. ५ वाजता)

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.