अवैध गर्भपात प्रकरणाचा फास आवळला

0

बीड, रयतसाक्षी : मुलींच्या जन्मदरात राज्यात पिछाडीवर असलेल्या बीड जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणाने राज्यात जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रशासनाने उपाय योजनांवर भर देत मागील पाच वर्षात जिल्ह्यातील दोषींच्या मुसक्या आवळल्या . प्रतिबंधक उपाय योजनांमुळे मागील दोन वर्षात मुला-मुलींचा जन्मदर समतोल स्थितीत येत असतानाच पुन्हा अवैध गर्भपात प्रकरणाच्या अमानवी धंद्यांनी डोके वर काढले आहे.

 

गर्भपातादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शीतल गाडे मृत्यू प्रकरण जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत दोषींची शोधाशोध सुरू केली असून पाच जणांविरोधात पिंपळनेर पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दोन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समितीचे पथक पुन्हा बक्करवाडी येथे गेलेले असून या प्रकरणातले जास्तीत जास्त हस्तक शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. सिताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे या ३० वर्षीय महिलेचा अवैधरित्या गर्भपात करताना मृत्यू झाला.

 

या घटनेने बीड जिल्ह्यात लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे उघड झाले. बीडसह जिल्ह्यातील अनेक डॉक्टर या पापामध्ये सहभागी आहेत. दरम्यान, प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात प्रचंड हालचाली सुरू करत गेवराई तालुक्यातील रानमळा येथून अंगणवाडी सेविका त्याचबरोबर सिस्टर यांना ताब्यात घेतले होते.

 

आज पहाटे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून मयत महिलेचा पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, मध्यस्थ महिला अंगणवाडी सेविका मनिषा सानप, सीमा सिस्टर यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके हे करत आहेत. दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची टीम ही बक्करवाडीला जाणार असून या प्रकरणातले एक ना एक धागे जुळवण्याचे काम यंत्रनेकडून केले जात आहे.

 

सिस्टरचा मृतदेह बिंदुसरा नदीत आढळला

या प्रकरणातील सीमा सुरेश डोंगरे (वय 45, रा. शिक्षक कॉलनी, बीड) या सिस्टरचा आज सकाळी बिंदुसरा धरणात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे .या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 

लिंग निदानासाठी बाहेरूनही येते गाडी

लिंग निदान करण्यासाठी जिल्हा बाहेरील काही डॉक्टर बीड जिल्ह्यात येतात. लिंग निदानाची घरपोच सेवा दिली जात असल्याचेही बोलले जाते. एवढेच नव्हे तर आडकाठी गावच्या रस्त्यावर गाडी उभा करून लिंगनिदान केले जात असल्याचेही बोलले जात असून या प्रकरणराचा तपास पोलीसांनी लावायला हवा.

 

लिंगनिदान केलं तरी कुठं ?

या प्रकरणात लिंग निदान ज्या दवाखान्यामध्ये झालं, ज्या महिला डॉक्टरने लिंग निदान केलं. त्या डॉक्टरचा शोध यंत्रणेला लागत नाही, की त्याकडे दुर्लक्ष केलं जातय? खरंतर सर्वात अगोदर लिंगनिदान करणारे महापापी पोलीसांच्या जाळ्यात असायला हवेत. अद्याप लिंगनिदान करणारे दोषी मोकाट असल्याची चार्च आहे. या प्रकरणतील दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी अशा भावना सामान्यातून उमठत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.