विम्याच्या लाभासाठी सुपारी देऊन कुंकू पुसले

मंचक पवार यांच्या खूनाचे गूड उलगडले, एक कोटी रूपयांच्या विम्यासाठी पत्नीनेच केला घात

0

बीड, रयतसाक्षी : बीडमध्ये विमा रकमेच्या हव्यासापोटी पत्नीनेच सुपारी देऊन पतीचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एक कोटी रूपये विमा रकमेच्या आमिषाने चक्क पत्नीनेच सुपारी देऊन कुंकू पुसल्याचा बीड पोलिसांनी छडा लावला. मारेकऱ्यांनी मयत मंचक पवार याच्या डोक्यात टामीने मारून घात केल्या नंतर अपघात झाल्याचे भाषविले. पण बीड पोलीसांनी कौशल्यपूर्ण् तपास करून या सिनेस्टाईल घातपाताचा छडा लावला. मंचक गोविंद पवार वय ४५  रा.वाला ,ता. रेणापूर जि.लातूर, हमु अंकुशनगर , बीड असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

 

अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर शनिवारी दि.११ पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह आढळून आला होता.  स्कुटीला वाहनाने धडक दिल्याप्रमाणे अपघात झाल्याचं भासविण्यात आलं होत. पण मंचक पवार व त्याची पत्नी दोघे एकाच दुचाकीवर असताना पतीचा मृत्यू तर पत्नीच्या चेहऱ्यावर कसलीच जखम नसल्यांच दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला एक कोटी रुपये विमा रकमेच्या हव्यसापाई दहा लाख रुपयांत चक्क कुंकू पूसण्याची  सुपारी दिली. त्यापैकी दोन लाख रुपये इसार म्हणून मारेकऱ्यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

दरम्यान या प्रकरणी आरोपी पत्नी गंगाबाई मंचक पवार वय ३७ रा. वाला, ता. रेणापूर, जि. लातुर  हल्ली मुक्काम अंकुश नगर बीड, श्रीकृष्ण् सखाराम बागल वय २७ वर्षे रा. काकडहिरा ता. बीड , सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे वय ४७ वर्षे रा. पारगाव सिरस ता. बीड व अन्य दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पत्नीसह तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतलं असून सुपारी घेणाऱ्या फरार दोघांचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.