बहूचर्चीत कृष्णूर धान्य घोटाळा: तीन वर्षापासून फरार उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर थेट नायगाव न्यायालयात

२० जून पर्यंत पोलीस कोठडी

0

नांदेड, रयतसाक्षी: राज्यभर गाजेल्या नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील कृष्णूर धान्य घोटाळ्यात आरोपी असलेले तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे मागील तीन वर्षापासून फरार होते. शुक्रवारी (दि.१७)  सकाळी ते स्वत: नायगाव न्यायालयासमोर हजर होत आत्मसमर्पण केले. नायगाव न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानंतर सीआयडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. वेणीकर हे स्वत: न्यायालयात अवतरल्याने पुन्हा एकदा राज्यभर गाजलेला हा धान्य घोटाळा चर्चेत आला आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर येथील एमआयडीसी भागातील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीमध्ये शेतकऱ्यांच्या धन्यावर प्रक्रिया उद्योग आहे. परंतु या कंपनीने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांना हाताशी धरून मालक अजय बाहेती वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार, आणि हिंगोलीचे ललीत खुराणा व व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धन्याचा काळाबाजार केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हा काळाबाजार मागील अनेक वर्षापासून सुरू असल्या कारणावरून पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी आपल्या पथकासह (दि.१८) जुलै २०१८ रोजी रात्री कृष्णूर एमआयडीसीतील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीत धाड टाकली. यावेळी या कंपनीत सार्वजनिक वितरण प्रणालीचे उभे असलेले जवळपास १९ ट्रक धान्य त्यांनी जप्त केले. या प्रकरणी १९ जणांना अटक करून त्यांच्याविरूद्ध तत्कालीन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी जवळपास बाराशे पानाचे दोषारोपत्र दाखल केले. यात जवळपास एक वर्षानंतर कोरोनाच्या संकटामुळे आरोपींना न्यायालयाने जामीन दिला.

 

या धान्य घोटाळ्यात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे ही आरोपी होते. मात्र ते फरार झाले. दरम्यानच्या काळात त्यांची नांदेडहून परभणी येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्यांनी जामीन मिळावा म्हणून नायगाव, बिलोली आणि औरंगाबाद येथील न्यायालयात अटपूर्व जामिनासाठी अर्ज केला, परंतु न्यायालयाने हा सार्वजनिक गुन्हा असल्याने त्यांचा जामीन फेटाळला.

 

दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टातून त्यांनी जामीन मिळवून परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला. काही दिवसांनी हे प्रकरण ईडीकडे गेल्याने यातील मुख्य आरोपी अजय बाहेतींना नागपुरच्या ईडीने अटक केली. तेव्हापासून संतोष वेणीकर हे पुन्हा फरार झाले. अखेर या प्रकरणी कुठेच जामीन होत नसल्याने ते स्वत: आज शुक्रवारी दि. १७ नायगाव न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सीआयडी पथकही नायगावात दाखल झाले असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी वेणीकर यांना अटक केली आहे.

 

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कृष्णूरचा धान्य घोटाळा चर्चेत आला आहे. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती नांदेड, हिंगोली, परभणी व जालना या चार जिल्ह्या पर्यंत पसरली होती. न्यायालयाने वारंवार जामिन नाकारल्यानंतर संतोष वेणीकरने तब्बल तीन वर्षाहून अधिक काळानंतर न्यायालयात शरणागती पत्कारली. तीन वर्षापूर्वी या प्रकरणावरून महसूल आणि पोलीस खात्यात चांगलाच संघर्ष पेटला होता. परंतू अखेर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवल्याने अखेर महसूल खात्याला सपशेल माघार घ्यावी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.