एक हिस्याने एसटी कर्मचारी कामावर

वेतनवाढीनंतरही संपाची कोंडी फुटेना; प्रवाशांचे हाल आणि खासगी वाहनधारकांकडून लूट सुरूच

0

मुंबई, रयतसाक्षी: एसटी कर्मचाऱ्यांना वाढवून देण्यात आलेल्या वेतनानुसार सुधारित वेतन मंगळवारी कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतरही कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत. निलंबन, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवामुक्ती, बदल्या अशी कारवाई आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ४१ टक्के वेतनवाढ असे एसटी महामंडळाचे सर्व उपाय निष्प्रभ ठरले आहेत. अद्यापही जेमतेम २२ टक्केच कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, तर १२७ आगारातील वाहतूक सुरू झालेली नाही.

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना ७ डिसेंबरपासून नवीन वेतनवाढ लागू केली आहे. २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही कर्मचाऱ्यांना दिला आहे. वेतन जमा झाल्यानंतर तरी कर्मचारी सेवेत येतील, अशी अपेक्षा महामंडळाला होती. परंतु कर्मचारी परतण्याचे प्रमाण कमीच आहे.

एसटी महामंडळाचे ९२ हजार २६६ कर्मचारी असून १९ हजार ९९५ कर्मचारी परतले आहेत. अद्यापही ७२ हजार २७१ कर्मचारी संपावर आहेत. यात चालक, वाहक पुन्हा कामावर रुजू होण्याची संख्या कमीच आहे. ६ डिसेंबरला १ हजार ८८६ चालक आणि १ हजार ७९० वाहकांची नोंद झाली होती. ७ डिसेंबरला हीच संख्या अनुक्रमे २ हजार ३१९ चालक आणि २ हजार ४९ वाहक अशी आहे. हे पाहता ४३३ चालक आणि २५९ वाहकच परतले आहेत.

एसटीच्या हजेरीपटावरील एकूण ३७ हजार २२५ आणि २८ हजार ५५ चालक आहेत. त्यामुळे चालक, वाहकांबरोबर प्रशासकीय व कार्यशाळेतील कर्मचारी पुन्हा रुजू होण्यासाठी महामंडळाला मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, मंगळवारी २५० पैकी १२३ एसटी आगारातून वाहतुक सुरु झाल्याची माहिती महामंडळाने दिली.

बदली, निलंबन, सेवा समाप्ती कारवाई सुरूच
संपात सहभागी असल्याच्या कारणावरुन सध्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्याही बदल्या केल्या जात आहेत. मंगळवारी ४४५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण १,५८७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. तर १३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्याही ९,९१० झाली आहे. तर सेवा समाप्ती केलेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची संख्याही २ हजार १४ पर्यंत पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.