पवारांना धमक्या देणं ही भाजपची संस्कृती आहे का? – संजय राऊत

शरद पवारांविषयी नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटचाही त्यांनी समाचार घेतला

0

रयतसाक्षी :  महाराष्ट्रातील अभूतपूर्व राजकीय उलथापालथीदरम्यान क्षणोक्षणी नवनवे अपडेट समोर येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर तसेच भाजपवर टीकेची झोड उठवली. शरद पवारांविषयी नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटचाही त्यांनी समाचार घेतला. आता ही लढाई कायदेशीर झाल्याचेही ते म्हणाले.

 

लक्षात ठेवा, बहूमत आणि आकडा चंचल असतो

संजय राऊत म्हणाले की, काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत, आता ही कायदेशीर लढाई आहे. पुढे काय होईल ते पाहू. त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. पण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे, हे मान्य. लोकशाही ही बहुमतावर चालते. पण पुन्हा सांगतो की, आकडा आणि बहुमत फार चंचल असते. ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील, त्या दिवशी त्यांच्या निष्ठेची बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. मला पूर्ण विश्वास आहे की, ज्या दिवशी ही वेळ येईल त्या दिवशी महाविकास आघाडीचं बहुमत पुन्हा सिद्ध होईल.

 

पवारांना धमक्या देणं भाजपची संस्कृती आहे का?

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या ट्वीटचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, काही लोकं आता शरद पवारांना धमक्या देत आहेत. या लोकांनी आधी बाळासाहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना धमक्या दिलेल्या आहेत, ही ज्याची त्याची संस्कृती आहे, पण ही भाजपची संस्कृती आहे का, असा प्रश्न मी विचारतोय.

 

शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही, अशी धमकी देणारा जर कोणी महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार पंतप्रधान मोदी, अमित शहांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, शरद पवारांसारखे नेते ज्यांचा आदर पंतप्रधान मोदी करतात, जगभरात केला जातो. अशा नेत्याविषयी चोरून सत्ता मिळवायची आहे म्हणून धमक्या देणं, त्यांच्या वयाचा, त्यांच्या तपस्येचा तुम्हाला आदर नसेल तर मला असं वाटतं की, मराठी म्हणून घ्यायला ते नालायक आहेत.

 

शिवसेना हा महासागर, कधी आटणार नाही

कोणत्या महाशक्तीत विलीन व्हायचं हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना हा महासागर आहे. हा महासागर कायम उसळलेला असतो, महासागर कधी अटत नाही, लाटा येतात लाटा जातात हीसुद्धा लाट निघून जाईल. पण जे गेले त्यांना पश्चात्ताप होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.