शिदोडमध्ये दिवसाढवळ्या जबरी चोरी

साडेपाच तोळे दागिन्यांसह नगदी लाख रूपये लंपास

0

रयतसाक्षी : शेतकर्‍याचं सर्व कुटुंब शेतात कापूस लावण्यासाठी गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा किचनच्या रुमचा दरवाजा टांबीने उचकटून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख पाच हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बीड तालुक्यातील शिदोड येथे शुक्रवारी (दि.२४) काल दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले.

 

राहुल देवीदास खुर्णे (वय ३२ वर्षे, रा. शिदोड) हे काल स्वत:च्या शेतात कुटुंबासह कापूस लागवडीसाठी गेले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विकलेल्या चारचाकी गाडीचे आलेले एक लाख पाच हजार रुपये घरातील कपाटात ठेवले होते. किचनची रुम आतून बंद करून घराला कुलूप लावून ते शेतात गेले होते. दुपारी अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाजा टांबीने उचकून घरात प्रवेश केला.

 

घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख पाच हजार रुपये असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. ही घटना शिदोड गावात भरदिवसा घडली. खुर्णे कुटुंब जेव्हा शेतातून परत आले तेव्हा आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पीएसआय पवनकुमार राजपूत यांनी भेट दिली. त्यानंतर श्‍वानपथक आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.