एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

फडणवीस उपमुख्यमंत्री, सत्तासंघर्ष संपुष्टात्, शनिवारी विधानसभेत बहूमत सिध्द करणार

0

रयतसाक्षी : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शपथविधी सोहळ्यात शिंदे समर्थकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. नवे सरकार शनिवारी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करणार आहे.

 

शिंदेची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्राच्या सर्व घटकाला न्याय देण्याचे काम करू. सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन काम करेन. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत. या साऱ्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन.

 

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले -‘मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. शिंदे एक तळागाळातील नेते आहेत. त्यांना राजकीय, विधिमंडळ व प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. ते महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी काम करतील असा मला विश्वास आहे.

मोदींनी अन्य एका ट्विटद्वारे फडणवीस यांचेही कौतुक केले. ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारल्याबद्दल शुभेच्छा. ते भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणा आहेत. त्यांचा अनुभव व कौशल्य सरकारसाठी एक संपत्ती असेल. महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आणखी मजबूत करतील,’ असे मोदी म्हणाले.

 

गडकरींनी दिल्या शुभेच्छा

केंद्रीय मंत्री नितीन यांनी ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodiजी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो, या सदिच्छा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री एकनाथ शिंदेजी यांचे तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री देवेंद्र फडणवीसजी यांचे हार्दिक अभिनंदन व दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.

 

अंतर्गत वादाचा तडका 

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र, राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. विशेष म्हणजे आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. मात्र, शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीसांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केले. त्यात देवेंद्र फडणवीस हे जे. पी. नड्डा यांचे म्हणणे मोठ्या मनाने मान्य करत उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा फोन केल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाल्याच्या बातम्याही आल्या.

 

भाजपचे धक्कातंत्र

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले. या घोषणेनंतर फडणवीसांनी मोठेपणा दाखवला, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद दिले, अशी भावुक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. गेल्या दहा दिवसांपासून हा सत्तासंघर्ष सुरू होता. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येती होती. मात्र, फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार शिंदे हे आज सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.