भाजपात रिमोट चालत नाही ,मग देवेंन्द्र यांचा कसा चालेल ?

शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवून भाजप शिवसेनेतील ठाकरे परिवाराचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे

0

रयतसाक्षी : २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक धक्कादायक निर्णय घेऊन देशाला चकित केले. भाषणबाजी करताना ते अतिशय उत्स्फूर्तपणे बोलतात, पण त्यांच्या प्रत्येकच वाक्यातील आशयाचे प्रतिबिंब कागदावरच उतरतेच असे नाही. एकूणच काय तर मोदींच्या निर्णयाचा कुणीही अंदाज बांधू शकत नाही अन‌् त्यांच्या राजकीय वरदहस्ताबाबतही कुणी काहीच सांगू शकत नाही.

 

मोदी काय निर्णय घेतील याचा त्यांचे निकटवर्तीयही अंदाज बांधू शकत नाहीत, उलट अनेकदा त्यांच्यासाठीही हे निर्णय धक्कादायकच असतात. खरे तर यालाच राजकारण म्हणतात. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणल्याबद्दल देवेंद्र फडणवीस गुरुवारी सायंकाळपर्यंत स्वत:ला ‘राजकीय चाणक्य’ मानत होते. त्यापूर्वी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ते भाजप नेत्यांसमवेत मिठाई खाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात मग्न होते. जणू काही आता मुख्यमंत्रिपदाचा मुकुट आपल्याच डोक्यावर चढणार आहे, असा त्यांचा आविर्भाव होता. पण गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.

 

पक्षाच्या आदेशानंतर फडणवीसांना मन घट्ट करून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा करावी लागली. आपण सरकारबाहेर राहून त्यांना मदत करू, असेही त्यांनी जाहीर केले. पण इथेच त्यांची चूक झाली. सतेला बाहेरून मदत करणे ‘ या भूमिकेचा अर्थ सरकारवर रिमोट कंट्रोल ठेवणे असा होतो.सर्वांनाच माहितीय, भाजपात किंवा त्यांच्या सरकारमध्ये अन्य कुणाचा रिमोट चालत नाही.

 

मग फडणवीसांना हा अधिकार कुठून मिळेल? अन‌् अर्ध्या तासात फडणवीसांना यशोशिखरावरून थेट ‘जमिनी’वर आणण्यात आले. ५५ पैकी ३९ आमदार आपल्याच पक्षातून खेचून आणणारे शिंदे खरे ‘जमिनी’वरील नेते. मग त्यांच्याच नेतृत्वाखाली फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या फडणवीसांची नाराजी शिंदे सरकारमध्ये अडचणी निर्माण करू शकते का, असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत. पण ‘असे काही होणार नाही.’ कारण, महाराष्ट्रातील शिंदे सरकारही आता गुजरातच्या धर्तीवरच चालेल. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्याची माहिती ‘ज्यांना’ देणे अपरिहार्य असेल, त्यांना द्यावीच लागेल. हाच ‘नियम’ पाळला तर सरकार निर्धोक चालत राहील.

 

राजकारणात असे आश्चर्यकारक निर्णय यापूर्वीही आलेत. व्ही.पी. सिंग यांच्या नावावर चंद्रशेखरांची नाराजी होती. देवीलाल यांनी ती दूर करत आपल्या नावावर अनुमोदन द्यायला लावले. चंद्रशेखर यांनी देवीलाल यांना नेता निवडण्याचा प्रस्ताव ठेवला अन‌् देवीलाल यांनी आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाच्या जोरावर व्ही.पी. सिंग यांचे नाव पुढे केले. या खेळीने चंद्रशेखरही चकित झाले अन‌् व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले.

 

 

भाजपला असे प्रकार नवीन नाहीत. त्यांच्या निर्णयाबाबत आतापर्यंत कुणीच ठोस अंदाज बांधू शकलेले नाही. त्यांनी आतापर्यंत आपल्या निर्णयाने सर्वांनाच चकित केलेय. यंदा तर आपल्याच पक्षाचे नेते फडणवीस यांना पक्षाने चकित केलेय. कदाचित हेच पक्षासाठी हितावह असेल. किमान आता तरी कुणी भाजपवर आरोप करू शकणार नाही की त्यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवून भाजप शिवसेनेतील ठाकरे परिवाराचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. उद्धव यांनी युतीचा धर्म सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्याचा राग त्यामागे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.