शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव: १६४ मतांसह बहूमताचा आकडा केला पार

संतोष बांगर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या ४० वर गेली आहे

0

रयतसाक्षी : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विधानसभा सभागृहात भाजप-शिंदे गटाची बहुमत चाचणी होत आहे. त्यापुर्वीच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गटासोबत बसमधून ते विधानभवनात दाखल होत आहे. संतोष बांगर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या ४० वर गेली आहे. तर शिवसेनेकडे आता केवळ १५ आमदार उरले आहेत.

 

विशेष म्हणजे संतोष बांगर यांनी कालच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मविआ उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज अचानक त्यांनी आपली बाजू बदलली आहे. दुसरीकडे, बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेकडूनही प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे व्हीपवरुन आजही शिंदे गट व शिवसेनेमध्ये संघर्ष पाहण्यास मिळत आहे.

 

  • सरकारने बहुमताचा आकडा पार केला. १६४ मते मिळाली. सध्या विरोधात मतदान सुरु आहे. आता शिंदेसेना व भाजपच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे.
  • विधानसभेच्या कामकाजास सुरुवात. भाजपकडून सुधीर मुनगंटीवारांनी मांडला विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. त्यानंतर मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
  • आजच शिंदे गटाच दाखल झालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी बहुमताच्या बाजूने मतदान करताच सेना आमदारांनी घोषणा दिल्या.
  • मतमोजणीला सुरुवात होताच विधानसभा सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. तोपर्यंत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सभागृहात दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे ते मतदानास मुकले आहेत.​
  • शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी मत देताच शिवसेना आमदारांनी ईडी-ईडीच्या घोषणा दिल्या.
  • शिंदे गटाने जारी केलेल्या व्हीपविरोधात शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विधानसभा अध्यक्षांना या व्हीपला मान्यता देण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, असा मुद्दा त्यांनी मांडला. मात्र, ११ जुलैच्या सुनावणीतच यावर निर्णय होईल, असे न्यायालय म्हणाले. त्यामुळे व्हीपबाबत शिवसेनेला दिलासा मिळू शकला नाही.
  • आशिष शेलार यांचे नाव तालिका अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे शेलार यांची यंदा मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोरांसह बसमधून विधानभवनात दाखल. भाजप आमदारही विधानभवनात.
  • बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांना संबोधित करतील. त्यानंतर हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील चैत्यभुमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करतील. त्यानंतर एकनाथ शिंदे थेट ठाण्याकडे निघतील.
  • ठाणे आणि मुंबई जिल्ह्याची सीमा धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर (आंनद नगर चेक नाका) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व जल्लोषात ठाणे नगरीत स्वागत करण्यात येईल. त्यानंतर ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेतील व निवासस्थानी जातील.

 

सेना जाणार कोर्टात

आज बहुमतासाठी शिंदे गटाने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे या आमदारांनी व्हीप पाळला नाही तर त्यांची आमदारकी रद्द करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो. दरम्यान, या निर्णयाविरोधात शिवसेना कोर्टात जाणार असल्याचे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले.

 

 

उद्धव ठाकरेंना झटका

विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र रविवारी रात्री उशिरा काढले. पत्रानुसार, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते, तर भरत गोगावले हे प्रतोद असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बहुमत चाचणीपुर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे.

 

फडणवीसांचे मार्गदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपच्या आमदारांची रविवारी रात्री मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदजारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांची नियुक्तीच रद्द केल्याने ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या १६ आमदारांच्या अपात्रेचा मुद्दाही निकाली निघण्याची शक्यता आहे. कारण याच गटनेत्यांनी बंडखोरांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका केली होती.

 

आज केवळ औपचारिकता

रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजप व शिंदेसेना गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी १६४ मते घेत विजय प्राप्त केला, तर सेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. एकूणच, आज होणारी बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी १२ आमदार गैरहजर होते. बहुमताच्या चाचणीला यातील काही हजर राहू शकतात. मात्र, त्यांच्या येण्याने अन् न येण्याने बहुमत चाचणीवर काहीएक परिणाम होणार नाही. कारण सरकारला बहुमतासाठी १४५ सदस्यांचे पाठबळ लागते. अध्यक्ष निवडीत सत्ताधाऱ्यांना १६४ सदस्यांचे पाठबळ मिळाले आहे.

 

शिवसेना भवनामध्ये बैठकांचे सत्र

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द केल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तसेच, शिवसेनेच्या १६ आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना भवनामध्ये आज उद्धव ठाकरे आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. कोर्टामध्ये तसेच रस्त्यावर ही लढाई कशापद्धतीने लढायची याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

 

मंत्रिमंडळाचा विस्तार

पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. ११ जुलै रोजी होणाऱ्या १६ आमदारांबाबतच्या सुनावणीचा विस्तारावर काहीही परिणाम होणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर, खातेवाटपावरुन शिंदे गटातील काही आमदारही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापुर्वीच कोसळू शकेल, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.